मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे)
सिनेमा सुपरहिट करण्यासाठी यशाचा नक्की काय फाॅम्युला असतो हा खरतर एक मोठा संशोधनाचा विषय आहे. परंतु एखादा प्रतिथयश नायक त्याच्या यशस्वी नायिका आणि संगीतकार यांच्या सोबतच यशस्वीपणे टीम बनवून आपल्या कारकिर्दीची घौडदौड कायम ठेवायचा प्रयत्न करत असतो. ह्यात नायक आणि संगीतकार ही टीम विशेषतः ठळकपणे उठून दिसते. उदाहरणार्थ राजकपूर आणि शंकर जयकिशन, दिलीपकुमार आणि नौशाद, देवानंद आणि सचिन देव बर्मन, शम्मी कपूर आणि शंकर जयकिशन, राजेश खन्ना आणि राहुल देव बर्मन व लक्ष्मीकांत प्यारेलाल, अमिताभ बच्चन आणि कल्याणजी आनंदजी, अगदी अलीकडच्या काळात तर शाहरुख खान आणि जतिन ललित पर्यंत हे समीकरण दिसून येते. पण ह्या सगळ्या मध्ये राजेश खन्नाने मात्र जेव्हा शक्य झाले तेव्हा काही आडवळणाच्या संगीतकारांसोबत सिनेमे केलेले आहेत. चला ! तर मग पाहूया असे कोणते संगीतकार आहेत की ज्यांच्या बरोबर सुपरस्टार राजेश खन्नाने १९६६-१९८७ या कालावधीत कोणते सिनेमे केले आहेत.
१. राजेश खन्ना आणि खय्याम – राजेश खन्ना च्या पहिल्या सिनेमाचं संगीत हे खय्यामनं दिलं होतं, खरतर त्याचा साईन केलेला पहिला सिनेमा होता राझ, परंतु चेतन आनंद चा आखरी खत पहिला पडद्यावर झळकला, यातील “बहारों मेरा जीवन भी सवाँरो” हे गाणं अजरामर होतं, पुढेही थोडीसी बेवफाई , दर्द आणि दिल- ए- नादान या राजेश खन्नाच्या सिनेमांना अजरामर संगीत दिले होतं खय्यामनं, ह्यातील थोडीसी बेवफाई मधलं “हजार राहें”, तर दर्द मधलं “प्यार का दर्द है” आणि दिल ए नादान मधलं “एक बार तुम्हे देखा है” ही गाणी विशेष उल्लेखनीय आहेत, खरंतर या सर्वच सिनेमांना खय्यामनं सुंदर संगीत दिले आहे, किशोर कुमार च्या आवाजातील ठेहराव ज्यांना ऐकायचा असेल त्यांनी या सिनेमातील राजेश किशोर कुमारची जादू नक्की ऐकावी किंवा पहावीत.
२. राजेश खन्ना आणि हेमंत कुमार – राजेशच्या खामोशी या सिनेमाला गायक हेमंत कुमार चं अजरामर संगीत लाभलय. यातील सर्वच गाणी मेलोडिअस होती, विशेषतः राजेश वर चित्रीत झालेलं आणि किशोर कुमारने गायलेलं “वो शाम कुछ अजीब थी” हे कमाल गाणं होतं, सोबत होती वहिदा रेहमानची, आसित सेन दिग्दर्शित या सिनेमानं क्रिटीक्सची मनं जिंकली होती, वहिदा रेहमानचा अभिनय आणि तितकीच तोलामोलाची साथ दिली होती राजेश खन्नाने सोबत पाहुणा कलाकार म्हणून होता धर्मेंद्र.
३. राजेश खन्ना आणि शंकर जयकिशन – १९७१-७२ च्या सुमारास नाकावर गाॅगल घातलेल्या राजेश खन्नाच्या छायाचित्रानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता, भारतातील रस्त्या रस्त्यावर त्याची ही छायाचित्रे कमालीची प्रसिद्ध झाली होती, ही छायाचित्रे होती सिप्पीच्या अंदाज सिनेमातील, खरंतर राजेश खन्ना या सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून होता आणि खरा नायक होता शम्मी कपूर, तसेच शम्मी कपूर नायक असल्याने खरंतर सिनेमाला संगीत दिले होतं शंकर जयकिशन या जोडीने , पण यातील राजेश खन्ना आणि हेमामालिनी वर चित्रीत झालेलं मोटार सायकल वरचं ” जिंदगी एक सफर है सुहाना ” या किशोरनं याॅडेलींग केलेल्या गाण्यानं लोकांनी सिनेमाला पण उचलून धरले, बाकीची गाणी पण छानच जमली होती, शंकर जयकिशन या जोडी पैकी जयकिशनचा हा शेवटचा सिनेमा, राजेश खन्ना आणि शंकर जयकिशन चा दुसरा सिनेमा होता दिल दौलत दुनिया, सामान्य लोकांच्या फारसा परिचयात हा नसलेला सिनेमा परंतु यातील पण गाणी छानच होती विशेषतः किशोरनं गायलेलं “साथ में प्यारा साथी है” हे गाणं आवर्जून इथे नमूद करावेसे वाटते.
४. राजेश खन्ना आणि सलिल चौधरी – राजेश खन्नाच्या दोन सिनेमांना सलिल चौधरी यांचे संगीत होते, यातील पहिला होता इत्तेफाक, परंतु इत्तेफाक मध्ये एकही गाणं नव्हतं होतं ते केवळ खऱ्या अर्थाने पार्श्वसंगीत, परंतु दुसरा सर्वात उल्लेखनीय सिनेमा म्हणजे हृषिकेश मुखर्जी यांचा मास्टरपीस आनंद. आनंदची गाणी सर्वच्या सर्व नितांत सुंदर आहेत, या गाण्यांनी सिनेमाला कमालीची उंची देवून ठेवली आहे, “मैंने तेरे लिए ही सात रंग के”, “कहीं दूर जब दिन ढल जाये”, “जिंदगी कैसी है पहेली”, “मेरे बीना तेरा कहीं जिया” ही सर्वोच्च गाणी आहेत, मधुमती नंतरचे सर्वोत्तम संगीत सलिल चौधरी यांनी आनंद मध्ये दिले आहे, आनंद मध्ये राजेश खन्ना करता किशोरकुमार नसूनही मुकेश आणि मन्नाडे यांनी कमालीचे अविस्मरणीय काम करुन ठेवलय.
५. राजेश खन्ना आणि सचिन देव बर्मन – ज्या सिनेमानं राजेश खन्नाला अखिल भारताचे पहिले सुपरस्टार पद बहाल केले तो सिनेमा म्हणजे आराधना, या आराधनाला संगीत दिले होतं संगीताचे भीष्माचार्य सचिन देव बर्मन यांनी. यातील आॅर्केस्ट्रेशन भलेही राहुल देव बर्मन (पंचमदा) यांचे असले तरीही मूळ चाली या सचिनदांच्या होत्या, यातील “मेरे सपनों की रानी” या गाण्यानं मोहिनी घातली होती, आणि बाकीची पण “कोरा कागज”, “बाँगो मे बहार है”, “रुप तेरा मस्ताना”, “गुनगुना रहे है भवरें”, “सफल होगी तेरी आराधना” अशी सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय, सुपरडुपर, सुपरहिट झाली. पुढे अनुराग, प्रेमनगर आणि रेंगाळलेल्या त्याग या राजेश खन्नाच्या सिनेमांना सचिनदांचे संगीत होतं, यातील प्रेमनगर हा उल्लेखनीय सिनेमा आहे, यातील “ये लाल रंग” आपण ऐकतो तेव्हा प्रत्येकाचा अक्षरशः देवदास होतो, प्रेमनगर चित्रपटातील सर्वच गाणी मेलोडिअस होती, अनुराग मध्ये राजेश खन्नाने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. तर त्याग हा खूपच रेंगाळलेला म्हणजे १९७० ला सुरू झालेला सिनेमा १९७७ मध्ये प्रदर्शित झाला होता, यातील “हम तुम” हे गाणं खूप छान आहे.
६. राजेश खन्ना आणि मदनमोहन – १९७२ साली सुपरस्टार राजेश खन्नाला हृषिकेश मुखर्जी यांनी चक्क बावर्ची मधून हाप चड्डीत पेश केले, सिनेमा कमालीचा जबरदस्त होता, याचं संगीत दिले होतं मदनमोहनने, बहुतांश गाणी मन्नाडेनी गायली होती, विशेष उल्लेखनीय म्हणजे “तुम बिन जीवन”, तर “गुड मॉर्निंग” हे पॅरेडी काॅमेडी गाणं तर अफलातून आहे.
७. राजेश खन्ना आणि कल्याणजी आनंदजी – राजेश खन्नाच्या पहिल्याचं राझ या सिनेमाचं संगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते, यातील मोहम्मद रफी ने गायलेलं “अकेले है चले आओ” विशेष लक्षात राहते, तर पुढे बंधन, सफर, सच्चा झूठा , मर्यादा, छोटी बहु, जोरु का गुलाम, मालिक मध्ये पण कल्याणजी आनंदजी यांनी संगीताचा साज चढवला, विशेषतः सफर, सच्चा झूठा आणि मर्यादा मधलं संगीत जबरदस्त आहे, बंधन व मालिक मध्ये महेंद्र कपूरचा आवाज वापरलाय राजेश खन्ना साठी. सफर मधलं किशोरनं गायलेलं “जिंदगी का सफर” हे गाणं तर कालातीत होउन बसलय, तसचं “जीवन से भरी” या गाण्याच्या बाबतीत पण आहे तर सच्चा झूठा मधलं “मेरी प्यारी बहनिया” हे बहुतेक सर्व लग्नात अजूनही वाजवलं जातं.
८. राजेश खन्ना आणि रवी – हे काँबिनेशन झालय, पहिल्यांदा डोली या सिनेमात आणि खूप नंतर आवाम या सिनेमात. डोली मधलं “सजना साथ निभाना” हे गाणं उल्लेखनीय आहे.
९. राजेश खन्ना आणि राजेश रोशन – काही थोडेच सिनेमे केलेले आहेत या जोडीने, ह्यात विशेष महत्त्वाचे म्हणजे मेहमूदचा जनता हवालदार आणि जे ओम प्रकाशचा आखिर क्यो होय, अन्वरनं गायलेलं “हमसे का भूल हुई” हे जनता हवालदार मधलं गाणं विशेष गाजलं आणि मोहम्मद अझीझने त्याच्या कारकिर्दीत गायलेलं सर्वोत्तम गाणं होतं आखिर क्यो मध्ये, आणि ते म्हणजे “एक अंधेरा लाख सितारे” होय.
१०. राजेश खन्ना आणि बप्पी लाहिरी – या काँबिनेशनचा सर्वात मोठा सुपरहीट सिनेमा होता १९८४ चा मकसद, पण त्या आधी मिथुन चक्रवर्ती च्या डिस्को डान्सर मध्ये राजेश खन्नाने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती, तर यातील सुरेश वाडकरने गायलेलं “गोरों की ना कालों की ये दुनिया है दिलवालों की” हे कमालीचं गाणं या सिनेमात होतं.
११. राजेश खन्ना आणि हृदयनाथ मंगेशकर – १९८१ मध्ये धनवान नावाचा एक सिनेमा आला होता , याचं संगीत दिले होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. यातील “ये आँखे देखकर” गाणं अगदी हृदयनाथ मंगेशकरांच्या पठडीतलं आहे पण ते राजेश खन्ना वर चित्रीत करण्यात आलेलं नाही, पण तरीही यातील “इधर आ आ आभी जा” हे वेगळं गाणं आहे जे राजेश खन्ना वर चित्रीत करण्यात आलेलं आहे.
१२. राजेश खन्ना आणि उषा खन्ना – सौतन या सुपरहिट सिनेमाचं संगीत दिले होतं उषा खन्ना यांनी. यातील सर्वच गाणी मेलोडिअस होती, विशेषतः “शायद मेरी शादी का खयाल” आणि “जिंदगी प्यार का गीत” है ही गाणी त्या काळात जितेंद्र आणि बप्पी लाहिरी यांच्या गोंगाटात पण वेगळी उठून दिसली हे महत्त्वाचे आहे.
१३. राजेश खन्ना आणि कनु राॅय – १९७४ ला राजेश ला अभिनयाचं चौथं फिल्मफेअर पारितोषिक ज्या सिनेमानं मिळवून दिले तो बासू भट्टाचार्य यांचा अविष्कार हा सिनेमा होय, हा सामान्य रसिकांच्या लक्षात राहणं कठीण होता तेव्हा पण, परंतु क्रिटीक्सची कौतुकाची थाप आणि राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांचा कमालीचा अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू होती, यातील “हसने की चाह ने मुझे” हे गाणं मन्नाडे यांनी कमालीचे गायलय. या अविष्कार चित्रपटाला संगीत दिले होतं कनु राॅय यांनी.
तर असा काही थोडा हटके नायक आणि संगीतकार यांचा ढोबळमानाने आढावा घ्यायचा प्रयत्न केला. वास्तविक राजेश खन्नाचे आवडते दोन संगीतकार होते.एक राहुल देव बर्मन ( पंचमदा ) आणि दुसरे लक्ष्मीकांत प्यारेलाल ही जोडी, कारण १९६९ च्या आराधना आणि दो रास्ते यांचे संगीताचे काँबिनेशन ( भलेही आराधनाचे संगीत सचिनदांचे असले तरीही त्यातील आॅर्केस्ट्रेशन पंचमचं तर दो रास्ते चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल) त्यानं त्याच्या कारकीर्दीत बरेचदा कायम ठेवलय पण जेव्हा जेव्हा त्याला चान्स मिळाला तेव्हा राजेश खन्नानं चाकोरीबाहेरची टीम करायचा पण नक्कीच प्रयत्न केला आणि हे त्याच्या समकालीन इतर नायकांपेक्षा विशेष उठून दिसले.
राजेश खन्ना आणि पंचम किंवा लक्ष्मीकांत प्यारेलाल हे यशस्वी काँबिनेशन आपण नेहमीच ऐकत आलोय पण कधीतरी थोडा हटके विचार करून या संगीतकाराकडे पण जाउन त्यांच्या संगीताचा मनमुरादपणे आनंद लुटता आला तर पहा, खरंतर ही पण गाणी आपण ऐकलेली किंवा पाहिलेली आहेत पण राजेश खन्नाची पंचम आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल विरहीत इतर संगीतकारां सोबतची गाणीही तितकीच तोलामोलाची आणि अजरामर कलाकृती म्हणून आहेत, मग भलेही ती तुलनेने कमी संख्येत का असेना पण कानसेनांना अक्षरशः न्हाऊन काढतील अशी ही सुमधुर गाणी आपल्या आयुष्याचा पण भाग म्हणून होती हे आता पुन्हा एकदा नव्याने समजेल, नाही का? अशी माहिती अतुल श्रीनिवास तळाशीकर यांनी दिली.







