मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – मुंबईसह महाराष्ट्रातील लॉकडाऊन मध्ये बंद असलेल्या एन.टी.सी.च्या सहा गिरण्या भविष्यातील बाजार पेठेचा कल लक्षात घेऊन पूर्ववत चालू करण्याचा सरकार प्रयत्न करील, असे आश्वासन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इरानी यांनी खासदार अरविंद सावंत यांना एका पत्राद्वारे दिले आहे. खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या गिरण्या पुर्ववत चालू करण्याचा आग्रह धरणारे पत्र केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इरानी यांना पाठविले होते.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,तसेच खासदार अरविंद सावंत यांना या प्रश्नावर निवेदन दिले होते. निवेदनात म्हटले होते,लॉकडाऊन मुळे बंद असलेले महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे चालू झाले.परंतु एन.टी.सी.च्या मुंबईतील टाटा,पोदार, इंडिया युनायटेड क्र.५,दिग्विजय तसेच मुंबई बाहेरील बार्शी, अचलपूर या सहा गिरण्या मात्र अद्याप बंद आहेत.तेव्हा केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इरानी यांच्या पर्यंत ही समस्या नेऊन कामगारांच्या रोजी- रोटी चा प्रश्न मार्गी लावावा,अशी शिष्टमंडळाद्वारे विनंती करण्यात आली होती.शिष्टमंडळात खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर,सुनिल बोरकर आदी होते.
वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इरानी यांनी आश्वासन देताना आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे, ‘कोविड-१९ ‘या महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले सहा महिने एन.टी.सी.च्या वेगवेगळ्या गोडाऊन मध्ये सुमारे १५० कोटी रुपये किमतीच्या तयार कपड्याचा माल विक्री अभावी पडून आहे.सध्या आमची प्राथमिकता पडून असलेल्या मालाची विक्री करून भांडवल उभारणीवर भर देणारी असेल ,असे सांगून वस्त्रोद्योग मंत्र्यांनी पुढे म्हटले आहे,सध्याच्या उत्पादनाची किंमत,मागणी आणि पुरवठा या परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून असून, संधी मिळेल त्या प्रमाणे पडून असलेला माल लवकरात लवकर विक्री करण्यात येईल.
सध्या विविध उद्योगाचे पुनरुज्जीवन करण्यावर सरकारचे प्रयत्न सुरू असून त्याचे द्रुश्य परिणाम दिसू लागले आहेत,असा हवाला देवून वस्त्रोद्योग मंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे, आतापर्यंत एन.टी.सी. कामगार, कंत्राटी कामगार, स्टाफ यांचा सप्टेंबर २०२० पर्यंतचा पगार तर अधिकारी वर्गाचा ऑगस्ट २०२० पर्यंतचा पगार देण्यात आला आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इरानी यांच्या घोषणेचे स्वागत करून,खासदार अरविंद सावंत यांनी हा प्रश्न तातडीने केंद्रीय स्तरावर नेऊन कामगारांना दिलासा मिळवून दिल्या बद्दल त्यांचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आभार मानले आहेत.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतिने गेले तीन महिने विविध आंदोलनाच्या मार्गाने रिकाम्या हाताला काम द्या! गिरण्या पूर्व वत चालवा! ही मागणी घेऊन हा प्रश्न धगधगत ठेवला होता. गिरण्या पूर्ववत चालवा या मागणीसाठी गिरणगावात आयोजिलेल्या आंदोलनात निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण,लक्ष्मण तुपे, शिवाजी काळे या पदाधिकार ऱ्यांनी पुढाकार घेतला होता. वरील वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या आश्वासनाचे आणि खासदार अरविंद सावंत यांच्या दिलासा युक्त कामाचे कामगार वर्गाने उत्स्फूर्त स्वागत केले आहे.







