अहमदनगर (प्रतिनिधी वाजिद शेख) – शिर्डी जवळच्या देशमुख चारीलगत राहणार्या रवींद्र साहेबराव माळी (वय 37) याचा गुरुवारी रात्री अकरा जणांनी मिळून हल्ला करत तिक्ष्ण हत्याराने हत्या केल्याची घटना घडल्याने शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली.
जून्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दि. 19 रोजी रात्री 10.30 वाजता आरोपींनी साईश्रद्धा किराणा स्टोअर समोर मयत माळी यांच्या मानेवर चाकूने वार करून हत्या केल्याची फिर्याद शिर्डी पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
आरोपी अजय वैजनाथ भांगे, विशाल रमेश पाटील, रवींद्र बनसोडे यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून वरील आरोपींसह अकरा जणांनी रवींद्र साहेबराव माळी याची हत्या केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी फिर्यादी रोहित रवींद्र माळी मयताचा मुलाने शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी अजय वैजनाथ भांगे, विशाल रमेश पाटील, रवींद्र बनसोडे, समीर शेख, राजू पठाण, रंजना वैजनाथ भांगे, ललिता रमेश पाटील, सुनील लोखंडे, अक्षय शिंदे, महेश गायकवाड, कुणाल जगताप, सर्व अकरा आरोपी सर्व रा.निमगाव यांचे विरुद्ध गु.र.क्रं. 748 /2020 भा.द.वि.कलम 302, 120 (ब),143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. व आरोपी रंजना भांगे, ललिता पाटील, सुनील लोखंडे, अक्षय शिंदे, महेश गायकवाडसह आणखी तीन असे एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा शोधात शिर्डी पोलीस आहे. या घटनेने राहाता तालुक्यात खळबळ उडाली आहे. नुकतेच शिर्डी साईबाबा मंदिर उघडले असताना हि धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे करीत आहे.







