मुंबई (हितेश मिस्त्री) – ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं अटक केल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया यांना अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यानंतर त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे.भारती सिंग सध्या ड्रग्ज कनेक्शनमुळे चर्चेत आली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) भारतीच्या घरावर छापा टाकला असता त्यांना तेथून गांजा मिळाल्यानं टीव्ही सृष्टीत खळबळ उडाली आहे.
भारती आणि हर्ष या दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून दोघांनीही जामीनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. कोर्टानं दिेलेल्या निर्णयानंतर हर्ष आणि भारती यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केले असून यावर उद्या म्हणजेच सोमवारी सुनावणी होणार आहे. भारती आणि हर्ष दोघांनी देखील ड्रग्जचं सेवन करत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज दोघांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून आज त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं.
कधी दोन वेळचं जेवण मिळणंही होतं कठीण, आज कोट्यवधींची मालकीण आहे भारती
सिनेसृष्टीतील नावाजलेली कॉमेडियन आणि आपल्या कष्टाने यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या भारतीचं बालपण मात्र फार खडतर होतं. ती दोन वर्षांची असताना वडिलांचं निधन झालं होतं. तिचं संपूर्ण बालपण गरिबीत गेलं.
एका मुलाखतीदरम्यान, भारतीने तिच्या बालपणाबद्दल सांगितलं होतं की, ‘मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, आम्ही एकूण चार भावंडं आहोत. माझ्या आईचं वयाच्या १७ व्या वर्षी लग्न झालं होतं आणि २३ वर्षांची असताना ती तीन मुलांची आई होती. असं कोणाला सांगितलं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही.’भारतीचं बालपण फार संघर्षमयी होतं.
भूतकाळातील आठवणींना उजाळा देताना तिने सांगितलं होतं की, ‘माझ्या मोठ्या भावाचा आणि बहिणीचा बहुतेक वेळ आमच्यासाठी जेवण करण्यात आणि छप्पर बनवण्यातच जायचा. आम्हाला त्यावेळी पुरेसं अन्नही मिळत नव्हतं.’
पण म्हणतात ना की वेळ बदलली की सारं काही बदलतं. २००८ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या चौथ्या सीझनमध्ये भारतीने भाग घेतला. यानंतर तिचं आयुष्य पुरतं बदलून गेलं. या शोमध्ये भारतीने ‘लल्ली’ नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. या कॅरेक्टरने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून राज्य करत आहे.
एकेकाळी उपाशी पोटी झोपणारी भारती आज जवळपास १०.९३ कोटी संपतीची मालक आहे. २०१९ मध्ये फोर्ब्सच्या यादीमध्ये भारती सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये ८२ व्या स्थानावर होती. सध्या भारती ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ या शोमधून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते.







