दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – दोंडाईचा- नंदुरबार रस्त्यावर रामी फाट्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडले. त्यांच्याकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस व बुलेट दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गुप्त माहिती मिळाली की, महेंद्र भगवानसिंग गिरासे उर्फ आप्पा (वय 35 रा. क्रांतीनगर, शिंगावे रोड ता. शिरपूर) हा गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करतो. त्याने महिनाभरात त्याचा साथीदार छोटू राजाराम गोपाळ (वय 31 रा. जुनी सांगवी ता. शिरपूर) यांच्या मदतीने शनिमांडळ (ता. नंदुरबार) येथील आनंदसिंग लोटनसिंग गिरासे याला एक गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री केले आहे. त्यानुसार वरील दोघांना ताब्यात घेऊन संशयीत आनंद शिंदे हा शनिमांडळ गावातून निघून दोंडाईचा-नंदुरबार रोडने त्यांच्या दलवाडेतील नातेवाईकाकडे येण्यासाठी बुलेट दुचाकीने (क्र. एमएच 41 ऐएक्स 6852) निघालेला असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील यांच्यासह पथकाने नंदुरबार-दोंडाईचा रोडवर रामी फाट्यावर सव्वा पाच वाजेच्या सुमारास सापळा लावला. आनंदसिंग लोटनसिंग गिरासे हा त्यांची बुलेट घेऊन इस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आला असता त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेच्या डाव्याबाजुस एक गावठी बनावटीचे पिस्तूल व त्याचे पॅन्टच्या उजव्या खिशात दोन जिवंत काडतूस असे मिळून आले. त्यांच्याकडून 15 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल (गावठी कट्टा), 1 हजार रुपये किंमतीची दोन जिवंत काडतुस व 1 लाख 30 हजार रुपयांची बुलेट दुचाकी असा एकुण 1 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि संदीप पाटील व पोहेकाँ महेंद्र कापुरे, पोना कुणाल पाटील, उमेश पवार, विशाल पाटील, रवीकिरण राठोड, किशोर पाटील यांनी केली आहे.







