कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्षला मिळाला जामीन

bharati-and-harsh

मुंबई (हितेश मिस्त्री) – मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने भारती सिंह आणि हर्षचा जामीन मंजूर केला आहे. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने शनिवारी कॉमेडियन भारती सिंह आणि हर्षच्या घरी एनसीबीने छापा टाकला होता. यादरम्यान भारतीच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान भारती सिंह आणि हर्षने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली होती.

 

कॉमेडियन भारती सिंहची जवळपास ६ तास चौकशी केल्यानंतर तिला अटक करण्यात आले होते. यानंतर रात्री उशीरा पती हर्षला एनसीबीने ताब्यात घेतले होते. रविवारी सकाळी भारती सिंह आणि हर्ष लिंम्बाचिया या दोघांची मेडिकल आणि कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता भारती आणि हर्षला कोर्टात हजर केले. माहितीनुसार दोन ड्रग्ज पेडलर्ससोबत भारती आणि हर्षला कोर्टासमोर हजर केले होते. तसेच काल हर्षच्या जामीनाचा अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला होता, पण कोर्टाने हर्षचा जामीन अर्ज फेटाळला.

 

मग कोर्टाच्या आदेशानुसार दोघांना न्यायालयीने कोठडीत रवानगी करण्यात आले होते. ४ डिसेंबरपर्यंत दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. भारतीला कल्याण जेल आणि हर्षला तळोज जेलमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर भारती आणि तिच्या पतीने जामीन अर्ज दाखल केला. ज्याची आज सुनावणी झाली. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर भारती आणि हर्षला जामीन मिळाला आहे.

 

भारतीने २००८ साली ‘द ग्रेड इंडियन कॉमेडी शो; या स्पर्धेतून अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. त्यानंतर भारतीने स्टँड कॉमेडी शो ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी सर्कस के सुपरस्टार’, ‘कॉमेडी सर्कस का जादू’ यांसारख्या शोमधून प्रेक्षकांना हसवले. त्यानंतर तिने अनेक बॉलिवूड चित्रपटात देखील काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here