नवी दिल्ली – मुंबईतील इव्हेंट मॅनेजर तरुणीवर दिल्लीत बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून न्यायालयात हजर केले असता, एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्या एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दिल्लीच्या एअरोसिटी परिसरात २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात संदीप मेहता (वय ५७) आणि नवीन डावर (वय ४७) या दोघांना अटक केली आहे. दोघेही हरयाणातील सोनीपत येथील रहिवासी आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
मेहता याच्याविरोधात कलम ३७६ अन्वये गुन्हा नोंदवला असून, त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. तर डावर याच्यावर कलम ३५४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ही घटना घडली. मेहता याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. बुधवारी ती दिल्लीला गेली होती. तिथे ती एका हॉटेलमध्ये थांबली होती. दुसऱ्या दिवशी ती मेहता आणि त्याचा मित्र डावर याला भेटली. डावरने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तिने केला आहे. तर मेहता हा हॉटेलवर सोडण्यासाठी आला होता. हॉटेलच्या खोलीत त्याने बलात्कार केला, असा आरोपही तिने केला आहे.







