वाराणसी – उत्तर प्रदेशातील वाराणसीत मुलींच्या वसतिगृहाच्या व्यवस्थापकाच्या हत्या प्रकरणात एक खळबळजनक माहिती हाती लागली आहे. व्यवस्थापक विशाल याची वसतिगृहात राहणाऱ्या मुलीशी मैत्री झाली होती. हेच त्याच्या मृत्यूचे कारण झाले. वाराणसी पोलिसांच्या तपासात हा ‘लव्ह अँगल’ उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
वाराणसीतील भेलुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैवल्यधाम कॉलनीत दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी वसतिगृहाजवळ व्यवस्थापकावर गोळीबार केला होता. शहराच्या मध्यवर्ती परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने खळबळ माजली होती. या घटनेनंतर पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी जखमी विशालला बीएचयू ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुर केला. दुचाकीवरून आलेले तरुण शस्त्रांसह परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या पथकानेही आरोपींचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी रविंद्रपुरीमधून आरोपींना अटक केली. विकास कुमार राय आणि सिद्धार्थ अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पिस्तुलही जप्त केले.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमित पाठक यांनी सांगितले की, अटक केलेला आरोपी विकास कुमार राय याची वसतिगृहात राहणाऱ्या मुलीसोबत मैत्री होती. या मुलीची व्यवस्थापकाशी मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीमुळे विकास दुखावला गेला. त्याने आपल्या मित्राच्या मदतीने व्यवस्थापकाची गोळ्या घालून हत्या केली.







