काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ हरपला : काँग्रेसचे शक्तीशाली सेल्फलेस नेते अहमद पटेल यांचे निधन

ahmed-patel

नवी दिल्ली – काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांचे आज (दि.२५) पहाटे ३.३० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकीय वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे कधीही कोणतेही मंत्रीपद नव्हते तरीही त्यांना आपली राजकीय कारकिर्द एका वेगळ्या उंचीवर नेण्यात कोणतीही अडचण आली नाही. त्यांच्याकडे एक ‘सेल्फलेस’ नेता म्हणून पाहिले जात होते.

 

त्यांचे आणि काँग्रेसवर दशकानुदशके पकड असलेल्या गांधी घराण्याचे ऋणानुबंध सर्वश्रृत आहेत. पण, गांधी घराण्याच्या इतके जवळ असूनही आणि मागेल ते मंत्रीपद आपल्याला मिळणार अशी खात्री असली तरी त्यांनी कोणतेही मंत्रीपद भुषवले नाही. त्यांची संपूर्ण कारकिर्द ही ‘मोठा नेता होण्यासाठी मंत्रीपद हवेच’ असा समज असलेल्या आजकालच्या नेत्यांना एक शिकवणच आहे.

भारतीय राजकारणात दशकानुदशके सत्तेत असलेल्या गांधी घराण्याच्या जवळ राहून अहमद पटेलांनी आपल्या जीवनात काय कमावलं? त्यांच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांनी पक्षाची महत्वाची पदे भुषणवण्यापलिकडे कोणतेही पद घेतले नाही. त्यांच्या बायोडेटामध्ये माजी मंत्री असे कधीही लागले नाही. पण, राजकीय वर्तुळात गांधी घराण्याचे विशेष करून सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांनी आपले नाव कमावले.

ज्या ज्या वेळी सोनिया गांधींच्या राजकीय जीवनाचा उल्लेख होईल त्या त्या वेळी अहमद पटेलांचे नाव घेतले जाणार नाही असे होणार नाही. त्यांनी अनेक अडचणीतून सोनियांच्या काँग्रेसला वाचवले. त्यांच्या जाण्यानंतरही खेळ्यांची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अनेक दशके चर्चा राहणार हे निश्चित.

 

अहमद पटेल यांची ओळख फक्त सोनिया गांधीचे विश्वासू सल्लागार अशी नाही. त्यांनी आपला राजकीय प्रवास १९७६ मध्येच गुजरातच्या भरुच जिल्ह्यातून केला. ते लोकनेता नाहीत असे म्हणणाऱ्यांनी जर त्यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकली तर त्यांनी आपली राजकीय सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून केल्याचे निदर्शनास येईल. त्यांनी १९७६ ला भरुच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाची राज्यातील आणि केंद्रातील विविध पदे भुषवली. ते गुजरातमधून तीन वेळा खासदार म्हणून लोकसभेत गेले. त्यानंतर त्यांनी राज्यसभेची वाट धरली. ते पाच वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. विशेष म्हणजे अहमद पटेल हे गुजरातमधून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून जाणारे एहसान जाफरी यांच्यानंतरचे दुसरेच मुस्लीम नेते होते.

पण, सोनिया गांधींचा राजकीय प्रवास हा नव्वदीच्या दशकात सुरु झाला. त्यापूर्वी अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे पती माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे विश्वासू म्हणून काम करत होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८५ मध्ये त्यांनी अहमद पटेल यांना आपला पर्लमेंटरी सेक्रेटरी बनवले. पटेलांनी सरदार सरोवर प्रोजेक्टवर देखरेख करण्यासाठी नर्मदा व्यवस्थापन प्राधिकरण तयार करण्यात मदत केली. यानंतर राजीव गांधी यांनी त्यांच्याकडे जवाहर भवन ट्रस्टची जबाबदारी दिली. अहमद पटेलांनी रायसीना रोडवरील जवाहर भवन एका वर्षाच्या रेकॉर्ड वेळेत पूर्ण करुन दाखवले. त्या काळातील ती अत्याधुनिक इमारत ठरली. ती इमारात कॉम्पुटर, टेलिफोन आणि विजेची बचत करणाऱ्या एअर कंडीशनने सज्ज होती. विशेष म्हणजे ही इमारत काँग्रेस खासदारांच्या फंडातून आणि निधी गोळा करण्यासाठी खेळवण्यात आलेल्या एकदिवसी क्रिकेट सामन्यातून उभारलेल्या निधीतून तयार करण्यात आली होती.

 

या यशस्वी इमारत उभारणीद्वारे अहमद पटेलांनी आपली फंड गोळा करण्याच्या क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. राजीव गांधींच्या काळात विश्वासाने आणि सचोटीने केलेल्या या कामामुळेच अहमद पटेल राजीव गांधींनंतर त्यांची पत्नी सोनिया गांधी यांचे विश्वासू सहकारी आणि सेक्रेटरी बनले. त्यांनी सोनिया गांधींच्या राजकीय जीवनात अनेक अडचणींमध्ये त्यांची मदत केली. सोनिया गांधींच्या नेतृत्वात ज्यावेळी काँग्रेसने २००४ ला युपीएचे आघाडी सरकार स्थापन केले त्यावेळी अहमद पटेलांना २००५ ला राज्यसभेवर घेण्यात आले. पण, त्यांनी मंत्रीपदाची लालसा न बाळगता पक्षासाठी काम करणेच पसंत केले. त्यांनी युपीए १ मध्ये मनमोहन सिंग सरकार आणि काँग्रेस पक्षातील दुवा म्हणून काम केले. ते अत्यंत लो प्रोफाईल नेते होते. त्यांनी कधीही माध्यमांसमोर चमकोगिरी केली नाही. पण, प्रत्येक अडचणीवेळी पडद्यामागून सुत्रे हलवत काँग्रेसला पर्यायाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला मदत केली.

अनेक राजकीय जाणकार अहमद पटेलांना सोनिया काळातील काँग्रेसचा रिमोट कंट्रोल म्हणत. सोनिया गांधीपर्यंत पोहचण्याचा मार्ग हा अहमद पटेलांना भेटल्याशिवाय शक्यच नसायचा. एपी नावाने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या अहमद पटेल हे राजकारण्यांबरोबर कॉर्पोरेट जगताशीही चांगले संबंध ठेवून होते. त्यामुळेच राहुल गांधींना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इच्छा नसतानाही काँग्रेसच्या खजानीस पदी पुन्हा अहमद पटेलांना आणावे लागले होते.

 

ज्याप्रेमाणे प्रणव मुखर्जी हे पडद्यासमोरचे संकट मोचक होते. त्या प्रमाणे अहमद पटेल हे पडद्यामागचे संकट मोचक होते. त्यांचे २३ मदर टेरेटा क्रिसेंट हे निवासस्थान हे रात्रींच्या गुप्त बैठकांसाठी प्रसिद्ध होते. तेथूनच रात्रीच्या गुप्त राजकीय हालचाली होत असत. युपीएच्या काळात मग तो २जी स्पेक्ट्रम घोटाळा असो किंवा २००८ मध्ये डाव्यांनी सोडलीली साथ असो. अहमद पटेलांनी पडद्यामागून सुत्रे हालवत युपीए सरकारला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, या ‘रात्रीस खेळ चाले’ रणनितीमुळे अहमद पटेलांवर काही भ्रष्टाचाराचे आरोपही झाले.

त्यांचे नाव युपीए सरकार वाचवण्यासाठी कॅश फॉर वोट प्रकरणात आले. भाजपने त्यांच्यावर खासदारांना विश्वास मतावेळी पैसे वाटल्याचा आरोप केला. पण, संसदीय चौकशी समितीला त्यांच्याबद्दल कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एपींचे नाव ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातही गाजले. पण, तेथेही चर्चेशिवाय काही हाती लागले नाही. नुकतेच भाजपने अहमद पटेलांच्या मागे अंमलबजावणी संचलनालयाचा ससेमिरा मागे लागला होता. त्यावेळी पटेलांनी हे सगळ भाजप सूड बुद्धीने करत आहे असा आरोप केला.

 

तंस बघायला गेलं तर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून अहमद पटेलांचे आणि मोदींचे ‘विशेष’ संबंध राहिले आहेत. मोदींच्या मुंख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात काँग्रेसची राज्यातील प्रचार रणनिती अहमद पटेलांकडे होती. त्यावेळी त्यांनी गुजरात दंगलीवरुन मोदींनी ‘मौत का सौदागर’ असा उल्लेख सोनिया गांधी यांनी करण्यामागे एपींचाच हात होता असे बोलले जाते. त्यानंतर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर याच एपींचे नाव ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात प्रकाश झोतात आले. त्यानंतर पटेलांची अखेरची राज्यसभा निवडणूक चुरशीची करण्यामागेही गुजरातच्या चाण्यक्याची महत्वाची भुमिका राहिली.

 

अशा काँग्रेसचे ट्रबलशूटर असणाऱ्या एपींना कोरोनावर मात्र मात करता आली नाही. त्यांना ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यांनी या कोरोनाविरुद्ध जवळपास दीड महिना लढा दिला. पण, अखेर मल्टीपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची २५ नोव्हेंबरला पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने अंतर्गत दुफळी माजलेली काँग्रेस आता अजूनच उघडी पडणार आहे. सोनिया गांधींनी त्यांचा ‘कॉम्रेड’ गमावल्याची भावना व्यक्त केली. या कॉम्रेडने सोनियांसाठी अनेक मोठी मोठी दिव्य पार पाडली आहेत. त्यांच्या जाण्याने आता सोनियांचा ‘रणनिती’कारच हरपला आहे. महाभारतात जसे कृष्णाच्या सारथ्याला फार महत्व होते त्याच प्रमाणे सोनिया काळातील काँग्रेसच्या इतिहासात एपी अर्थात अहमद पटेलांच्या आध्यायाला अनन्य साधारण महत्व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here