२६/११ मुंबई हल्ला त्या १० दहशतवाद्यांसाठी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात होणार विशेष प्रार्थना

mumbai-26-11-attack

नवी दिल्ली – मुंबईवर २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने जमात-उद-दावा या राजकीय संघटनेच्या मदतीने पंजाबमधील साहिवाल शहरामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. मुंबईमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये ठार केलेल्या दहशतवाद्यांसाठी आज या कार्यक्रमामध्ये विशेष प्रार्थना केली जाणार आहे.

 

पाकिस्तानातील वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार लष्कर-ए-तोयबाने मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी विशेष प्रार्थनेचे आयोजन केलं आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लश्कर आणि जमात एकत्र मिळून या कार्यक्रमाचे आयोजन करणार असून येथील मशिदींमध्ये विशेष प्रार्थना केली जाणार आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत ठिकठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांना ठार केलं होतं. तर या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या अजमल कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी फाशी देण्यात आली होती.

 

मागील माहिन्यामध्ये अमेरिकेची तपास यंत्रणा फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे मान्य केलं होतं. एफआयएने मुंबईमधील ताज हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचे ११ दहशतवादी सहभागी होते असंही म्हटलं होतं. एफआयएनेच दावा केल्याने पाकिस्ताननेही या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली बोट विकत घेणारी व्यक्ती मोहम्मद अमजद खान हा मुल्तानचा असल्याचे मान्य केलं आहे. तसेच तो अजूनही पाकिस्तानमध्ये राहत असल्याचंही म्हटलं आहे. ताजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधील नऊ दहशतवादी हे याच बोटीने आले होते.

 

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील ताज हॉटेलसहीत सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये १६० जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झालेल्या हल्ल्यात झाले. तर ताजमध्ये दहशतवाद्यांनी ३१ जणांचे प्राण घेतले. जवळजवळ ६० तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here