ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण देश हादरला होता. या दहशतवादी हल्ल्यांत 160हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या क्रूर हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने बॉलिवूडमधील कलाकारांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेता अक्षयकुमारने शहीदांना श्रद्धांजली वाहताना लिहले की, ‘26/11 हा दिवस मुंबईकर कधीही विसरू शकत नाहीत. शहीद आणि पीडितांना माझ्याकडून श्रद्धांजली! ज्यांनी या हल्लात स्वत:चा विचार न करता सर्वोच्च बलिदान दिले, त्यांचा मी नेहमीच ऋणी असणार आहे.
शिल्पा शेट्टीने देखील ट्विट करत म्हटले की, ‘या हल्ल्यामुळे बदललेल्या प्रत्येक जीवनासाठी शांती मिळावी यासाठी शहीदांना श्रद्धांजली!’
अभिनेता रणवीर शौरीने ट्विट करत म्हटले आहे की, “ही घटना कधीही विसरणार नाही आणि त्यांना कधीही माफ करू शकणार नाही.”
या व्यतिरिक्त इतर बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.







