ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – शहरात एका कुत्र्याला मारहाण करुन जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोस आली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाघबीळ परिसरात असलेल्या किंगकॉंग नगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. ललित मलिक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी धीरज रेड्डी याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ललित मलिक हे घटनेच्या दिवशी आपल्या घराकडे येत असताना त्यांचा हात चुकून तेथे पार्क करण्यात आलेल्या मोटरसायकलवरील झेंड्याला लागला. रेड्डी याने हे पाहिले आणि त्यानंतर त्याने रागाच्या भरात ललित मलिक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
या घटनेनंतर आरोपी रेड्डी हा पुन्हा मलिकच्या घरी आला. यावेळी मलिक यांच्या घराबाहेरील कुत्रा रेड्डीला पाहून भुंकू लागला. कुत्रा भुंकत असल्याच्या रागाने रेड्डी याने कुत्र्याला मारहाण केली यानंतर रेड्डीने त्याला जिवंत जाळले. हा सर्व गोंधळ ऐकूण शेजारील नागरिक घराबाहेर आले असता रेड्डी याने आपल्याकडील चाकूचा धाक दाखवत मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी मलिक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कासारवडवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. खैरनार यांनी माहिती दिली की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला यापूर्वीही दरोड्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.







