लखनऊ – उत्तरप्रदेशातील संभल जिल्हा रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथे एका भटका कुत्रा चक्क मृतदेहाचे लचके तोडत असल्याचं समोर आलं आहे. एका अल्पवयीन मुलीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता आणि त्यानंतर तिचा मृतदेह रुग्णालयात एका स्ट्रेचरवर ठेवण्यात आला होता. रुग्णालयात मृतदेहासोबत झालेल्या या घटनेनंतर मृतक मुलीच्या वडिलांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं की, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुलीचा मृतदेह एक तास भरासाठी लावारिस सोडलं होतं.
मृतक मुलीचे वडील चरण सिंह यांनी म्हटलं, माझी मुलगी स्ट्रेचरवर दीड तास होती आणि रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व घडलं आहे. मृतदेहाच्या जवळपास रुग्णालयातील एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. मृत मुलीच्या वडिलांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणाले, अधिकाऱ्यांनी मृतदेह कदाचित एका मिनिटासाठी तेथे सोडला असेल त्यामुळे असे होऊ शकते. मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुशील वर्मा यांनी सांगितले की, औपचारिकता पूर्ण केल्यावर मृतदेह मुलीच्या नातेवाईकांना सोपवण्यात आला. मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन न करण्याची त्यांची इच्छा होती आणि मृतदेह त्यांना दूर न्यायचा होता. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात मी महानगरपालिकेला पत्र लिहिले आहे पण काहीही उपयोग झाला नाहीये. या संपूर्ण घटने प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुख्य वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुशील वर्मा यांनी म्हटलं, प्राथमिक तपासानंतर या प्रकरणात वॉर्डबॉय आणि सफाई कामगार जबाबदार असल्याचं दिसून आलं आहे. त्या दोघांनाही आम्ही निलंबित केलं आहे आणि त्यावेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांकडून आम्ही स्पष्टीकरण मागवले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे.
ही घटना समोर येण्याच्या एक दिवसआधी अलीगढ येथील एका कुटुंबाने आरोप केला होता की, त्यांच्या नवजात मुलाचा मृत्यू रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. इतकेच नाही तर त्यांनी आरोप केला होता की, त्यांच्या मुलाच्या शऱीरावर जनावराने चावा घेतल्याच्या खुणा होत्या.







