तेहरान – इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील प्रमुख शास्त्रज्ञ मोहसीन फखरिझादे यांची शुक्रवारी तेहरान प्रांताच्या पूर्वेकडील भागातल्या अबार्द शहरात हत्या करण्यात आली. फखरिझादे ज्या कारमधून प्रवास करत होते त्या कारला लक्ष्य करुन ग्रेनेड फेकण्यात आले नंतर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात फखरिझादे गंभीर जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. इराण सरकारने हा दहशतवादी हल्ला होता, असे जाहीर करुन या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले.
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचे लष्करी सल्लागार होसैन देहघन यांनी अणुशास्त्रज्ञाच्या हत्येमागे इस्रायल असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे सांगितले. हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे हे तपासले जाईल आणि दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. इराणच्या अणुशास्त्रज्ञाच्या हत्येप्रकरणी अमेरिका आणि इस्रायल यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. नियमानुसार २० जानेवारी २०२१ रोजी ते सत्तेचे हस्तांतर पूर्ण करतील आणि नवे अध्यक्ष जो बायडेन अमेरिकेचे नेतृत्व करतील. पण ही प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच ट्रम्प प्रशासन हल्ले करेल, अशी शक्यता इराणने व्यक्त केली आहे. ही शक्यता व्यक्त झाल्यानंतर काही दिवसांतच इराणच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील प्रमुख शास्त्रज्ञ मोहसीन फखरिझादे यांची हत्या झाली. अमेरिकेने या प्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका पत्रकाराचे ट्वीट रीट्वीट केले आहे. पत्रकार योसि मेलमन यांनी फखरिझादे हे इराणच्या गुप्तपणे सुरू असलेल्या अणुबॉम्ब निर्मिती कार्यक्रमातील प्रमुख शास्त्रज्ञ होते आणि त्यांची हत्या इराणसाठी मोठा धक्का असल्याचे मत व्यक्त केले आहे.
इराण सरकारने त्यांच्या नियंत्रणात असलेल्या अनेक सशस्त्र टोळ्यांना कोणत्याही मुस्लिम बहुल देशात अमेरिकेच्या सैनिकांवर कारवाई करू नका, असा गुप्त संदेश दिल्याची चर्चा आहे. ट्रम्प प्रशासन सत्ता सोडण्याआधी एखाद्या हल्ल्याचे निमित्त करुन इराणविरोधात मोठी सशस्त्र कारवाई सुरू करण्याची शक्यता असल्यामुळेच हा गुप्त संदेश देण्यात आल्याची चर्चा आहे.







