चाळीसगाव (विशेष प्रतिनिधी) – ‘त्यांनी मागून हल्ला केला, समोरुन केला असता तर माझ्या यशने 3 जण तरी मारले असते’, अशी प्रतिक्रिया शहीद जवान यश देशमुखचे वडील दिगंबर देशमुख यांनी दिली आहे. जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हा जवान शहीद झाला आहे. आज या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
यशचे वडील दिगंबर देशमुख यांनी सांगितलं की, यश सप्टेंबर महिन्यात घरी आला होता. 2 ऑक्टोबरला परत गेला. 4 दिवसांपूर्वी फोनवर बोलणं झालं होतं, कसे आहात विचारलं होतं. गुरुवारी दुपारी मला लष्करी अधिकाऱ्यांचा फोन आला. तो खूप जिद्दी होता, परिस्थितीची त्याला जाणीव होती, असं त्यांनी सांगितलं.
शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव थोड्याच वेळात त्यांच्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथे पोहोचणार आहे. दरम्यान गावी जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी फलक लावत यशला श्रद्धांजली अर्पण केली जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत.







