केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या रक्षा ऑटो फ्युएल्स या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

रक्षाताई खडसे

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) । केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मालकीच्या राष्ट्रीय महामार्गापासून जवळच असलेल्या रक्षा ऑटो फ्युएल्स या पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास दरोडा पडला आहे. सशस्त्र दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करत रोख रक्कम लुटली आहे.

ही घटना रात्री सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. दोन दुचाकींवर आलेल्या पाच अज्ञात दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर तैनात असलेल्या प्रकाश माळी आणि दीपक खोसे या कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ला चढवला. दोघांनाही बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याकडे व काउंटरमध्ये असलेली अंदाजे एक लाख रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेण्यात आली.
पुरावे नष्ट करम्यासाठी दरोडेखोरांनी ऑफिसमधील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील नष्ट केली. त्यामुळे तपासात अडथळा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक तपासात दरोडेखोर बोहर्डी गावाच्या दिशेने पसार झाल्याचे समजते. पोलिसांनी त्या दिशेने शोधमोहीम राबवली असून सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या मदतीने दरोडेखोरांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here