पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. लांडे हे आज सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका तपास कामासाठी गेले असता फलटण येथील संशयित आरोपींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारातून लांडे थोडक्यात बचावले.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झाली होती. अज्ञातांनी दुचाकीवरून जाणाऱ्या सराफ व्यावसायिकाला अडवून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकले होते व त्याच्याकडून ११ लाख ६६ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. याबाबत व्यावसायिक अमर रंगनाथ कुलथे (रा. मोरगाव ता. बारामती) यांनी फिर्याद दिली होती. या घटनेचा महिनाभरापासून तपास सुरू होता.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडे यांना सदर घटनेतील संशयित माने नावाची व्यक्ती सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वडले गावात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून लांडे हे आपल्या सहकाऱ्यांसह वडले येथे गेले असता त्यांच्यावर संशयितांनी गोळीबार केला. मात्र, या गोळीबारात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.







