पत्नीची हौस पुरवण्यासाठी ‘तो’ बनला चोर

surat-motorcycle-thief

सूरत – पत्नीची हौस पुरवण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातच्या सूरतमधील एका हिऱ्याच्या कंपनीत आरोपी नोकरी करत होता. मात्र, पत्नीच्या वाढलेल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी मिळणारा पगारही अपुरा पडत होता. त्या पूर्ण करण्यासाठी तो चोर बनला.

 

दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीबाबत खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ३७ वर्षीय बलवंत चौहान याला वराछातील हिराबाग सर्कल येथून अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत त्याने धक्कादायक माहिती दिली. पत्नीच्या मोठ्या बहिणीचं लग्न एका बांधकाम व्यावसायिकाशी झाले होते. तिच्याकडे खूप पैसा होता. पत्नीलाही हायफाय राहायला आवडायचे. पण एका पगारात त्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्या पूर्ण करण्यासाठी दुचाकी चोरी करण्यास सुरुवात केली, असे आरोपीने सांगितले.

 

आर्थिक परिस्थितीवरून पत्नी नेहमीच टोमणे मारत असे. ती नेहमीच त्याला हिणवायची. बहिणीच्या नवऱ्यासोबत त्याची तुलना करायची. त्यामुळे पैसे कमावण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग अवलंबला. हिऱ्याच्या एका कंपनीत काम करून महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये मिळायचे. लॉकडाऊनच्या काळात नोकरीही गेली. त्यामुळे आरोपीने दुचाकी चोरी करण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीकडून ३० दुचाकी जप्त केल्या आहेत. कापोडरा, कटरगम, वारछा आणि अमरोली परिसरातून त्याने दुचाकी चोरल्या होत्या. त्याने पहिल्यांदा २०१७ मध्ये दुचाकी चोरली होती. यावर्षी त्याने २५ दुचाकी चोरल्या, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here