क्लीनअप मार्शलच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून मारहाण

cleanup-marshal

मुंबई (हितेश मिस्त्री) – मास्क न घालणाऱ्या महिलेला विचारणा करणे महापालिकेच्या क्लीनअप मार्शलच्या जीवावर बेतल्याची घटना बुधवारी भांडुप येथे घडली. तीन महिलांनी मिळून क्लीनअप मार्शलला मारहाण केली. भांडुप पोलिसांनी हल्ला करणाऱ्या या महिलांना अटक केली.

 

 

महापालिकेच्या क्लीनअप मार्शल दर्शना चौहान बुधवारी भांडुप रेल्वे स्थानक परिसरात कर्तव्य बजावत होत्या. दुपारी दोनच्या सुमारास एक महिला मास्क न लावता फिरत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी या महिलेला अडविले आणि मास्कबाबत विचारणा केली. या महिलेने चौहान यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर हातही उगारला. त्यांच्यातील वाद पाहून आणखी दोन महिला तिथे आल्या आणि चौहान यांना मारहाण करू लागल्या. एकीने तर रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लॉक चौहान यांच्या डोक्यात मारला.

 

या हल्ल्यात जखमी झालेल्या चौहान यांना मुलुंड येथील अगरवाल रुग्णालयात दाखल केले. याबाबतची माहिती मिळताच भांडुप पोलिस तेथे पोहोचले आणि चौहान यांची तक्रार घेतली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तीन महिलांना अटक करण्यात आली. या महिला भांडुप परिसरात घरकाम करतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here