डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता…!!! – आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

    babasheb-ambedkar

    ( विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, समाजकारण, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये विलक्षण दबदबा असलेले फर्डे वक्ते आचार्य अत्रे यांनी त्यांच्या दैनिक ‘मराठा’ या वर्तमानपत्रातून बाबासाहेबांवर लगातार सात दिवस सात अग्रलेख लिहिले होते. त्यांपैकी ७ डिसेंबर १९५६ चा हा पहिला ‘अग्रलेख’ )

    बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतातल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला.

     

    पाच हजार वर्षे सनातनी हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड. मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहातील कणाकणांतून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली ‘भीमा’ची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक युद्धच होय.

     

    महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यस्थेविरुद्ध बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उद्धाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर सनातनी हिंदू समाजाने मारेकरी घातले. कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदू-मुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिद्ध झाले.

    बुद्ध धम्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्याचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरूंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते.

     

    जुलूम आणि अन्याय म्हटला की, आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या-धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागे. म्हणूनच ‘लोकसभे’त काल पंडित नेहरू म्हणाल्याप्रमाणे, “हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलुमाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.” हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करून दाखविली.

    जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरांपेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे कोट्यवधी हिंदू धर्मीयांना कित्येक वर्षांपासून ते बजावत होते. माणसासारख्या माणसांना ‘अस्पृश्य’ मानणारी ती तुमची ‘मनुस्मृती’ मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारून सांगितले होते.

    यामुळे हिंदू धर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की, आंबेडकर हे गझनीच्या महंमदांपेक्षाही हिंदू धर्माचे भयंकर दुश्मन आहेत. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की, “आंबेडकरांना तुम्ही मारलेत; तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील!

     

    आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे, असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा, असे टाहो फोडून ते सांगत होते.

    धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ”हिंदू धर्मावर मला सूड घ्यायचा असता; तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करून टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही!” हिंदू धर्मांप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत. त्यामुळे जनाब जिनांप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करून हिंदी स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरीत आहेत, अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली.

     

    अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहात असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध गांधीजींनी जसे बंड पुकारले; तसे अस्पृश्यता नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुद्ध का बंड पुकारू नये, असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यता निवारणाबाबत गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्यशाहीविरोधी पातळीवर कॉंग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही.

    तथापि, गांधीजींबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे ‘करारा’वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचे प्राण घ्यावे आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचे प्राण वाचवावे ह्याचा अर्थ हिंदू समाजाला अगदी उमजू नये याचे आम्हास दु:ख होते.’पुणे करारा’वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले; पण स्वत:चे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी ‘पुणे करारा’वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कॉंग्रसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही. आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेत्तर अस्पृश्यांना हाती धरून कॉंग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणूकीत पराभव केला; आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले.

    आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत की, ”स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि कॉंग्रेस ह्यांनी ह्या देशातून नेस्तनाबूत करून टाकले!” नऊ कोटी मुसलमानांना खूश करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केले नाही.

    असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, “जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही; आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे, असे आज ना उद्या मुसलमानांना कळून आल्यावाचून राहणार नाही!” आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांच्या देदीप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय.

    काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला; आणि ‘स्वतंत्र भारता’ची राज्यघटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली.

    ‘मनुस्मृती जाळा म्हणून सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे!’ राज्यघटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदू कोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या; आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही.

    आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते; तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुर्दैव भारताचे! दुर्भाग्य हिंदू समाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला.

    राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथाडले; तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उद्धार करण्यासाठी त्यांना अखिल मानवजातीला समतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुद्धाला शरण जाण्यावाचून गत्यंतर उरले नाही.

    डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूलादेखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रातच नव्हे; तर भारतात याक्षणी सापडणार नाही. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन यांवाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षाही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रांपासून ते घटनाशाखेपर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता, की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती.

    तथापि, आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती, ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुद्धीवादी असले; तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठेचा होता. भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता.

    शुचिर्भूत धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्मांचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे, असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिले. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे, असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची प्राज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सदैव संचारला असे. आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुद्धाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यच नव्हेत; तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली, तेव्हा “साऱ्या भारताला मी बौद्ध करीन!” अशी गगनभेदी सिंहगर्जना केली. पुढील आठवड्यात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुद्ध धम्माची दीक्षा देणार होते. पण अदृष्टात काहीतरी निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी सबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते. दुर्बल झाले होते. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातला कणन्-कण आसूरला होता. भगवान करुणेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला; तेव्हा त्यांच्या अंतःकरणात जळणारा वन्ही शांत झाला. आपल्या कोट्यावधी अनुयायांना आता आपण उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे. आता आपले अवतार कार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली. आणि निद्रा माऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योत निर्वाणात कधी विलीन करून टाकली; जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंधवार्तासुद्धा लागली नाही.

    “मी हिंदू धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता. पण मी हिंदू धर्मात कदापि मरणार नाही!” ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माविरुद्ध रागाची नव्हती. सूडाची नव्हती. तर झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते.

    आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाज सुधारकाची वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी; तसेच आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी व सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे.

    आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल; तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल.

    भारतातील जे जे म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान प्रणेते होते.

    महाराष्ट्र आणि मुंबई यांचे नाते जे देवाने जोडले आहे. हे कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही, असे ते म्हणत. बाबाचे कोणकोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे? सात कोटी अस्पश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे! भगवान बुद्धाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रूतरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावे की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे! त्यांनी जो मार्ग आखला आणि जो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधानं जाऊन त्यांच्या कोट्यावधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा! आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विद्वत्ता, त्यांचा त्याग, चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपापल्या जीवनात निर्माण करण्याचा जर आटोकाट प्रयत्न केला; तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल. तीन कोटी मराठी जनतेच्या वतीनं व्याकूळ हृदयाने आणि अश्रपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो!

    – प्रल्हाद केशव अत्रे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here