आकर्षक परताव्याचे आमिष दाखून ठेवीदारांची २१.४५ कोटींची फसवणूक; चार जणांना अटक

miraroad-police

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या पतपेढीच्या संचालकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. मीरारोडच्या शांतीपार्क परिसरात मलायका मल्टिस्टेट पतपेढीने आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून १६६ ठेवीदारांना जाळ्यात ओढले. त्यांची २१ कोटी ४५ लाख ३५ हजार ६७३ रुपयांची फसवणूक केली आहे.

 

मीरारोड येथील शांतीपार्क भागातील हॅप्पी होम सोसायटीमध्ये मलायका मल्टिस्टेट कॉ. ऑप. क्रेडिट. सोसायटी लिमिटेडचे कार्यालय आहे. पतपेढीने ठेवीदारांना आकर्षक व्याज देण्याची जाहिरात केली आहे. तसेच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून वाढीव व्याजदर मिळतील असे ठेवीदारांना आमिष दाखविले. मुदत ठेव, रिकरिंग खाते, बचत खाते, शेयर व इतर वेगवेगळ्या स्वरूपात रक्कम गुंतविण्यास आकर्षित केले होते.

 

आकर्षक परताव्याला भुलून १६६ ठेवीदारांनी पतसंस्थेत २१ कोटी ४५ लाख ३५ हजार ६७३ रुपयांची गुंतवणूक केली. ही संपूर्ण रक्कम संचालक मंडळाने स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मीरा रोड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या तपास पथकाने शोध घेत सोसायटीचे चेयरमेन गिल्बर्ट बॅपप्टिस्ट, संचालक नॉवेल मस्कनेस, प्रकाश कोटीयन व दिनेश पुजारी या चार जणांना अटक केली आहे. ठेवीदारांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी मीरारोड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here