पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) –नवरा-बायकोचा वाद पोलिस ठाण्याच्या दारात पोहचल्यानंतर घेतलेल्या झडतीत दोन गावठी पिस्तुले आणि १० जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला आहे. याप्रकरणी, फिर्यादी महिलेच्या पतीसह बारामतीतील एका सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी अटक असून बाळासाहेब उमाजी मदने (रा. चौधरीवस्ती) व सुग्रीव अंकुश भंडलकर (रा.बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील सुग्रीव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ग्रामीण पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
चंदननगर पोलिस ठाण्यात एका महिलेने पतीविरुध्द घरगुती हिंसाचाराची तक्रार दिली होती. यावेळी तिने पतीकडे काडतुसे असल्याने आपल्या जीवाला भीती असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीला चौकशीसाठी बोलावून घेतले. तो कारमधून पोलिस ठाण्यात आल्यावर त्याच्या कारची झडती घेतली असता, त्यामध्ये चार काडतुसे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती विचारत त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरी गावठी पिस्तुल असल्याचे सांगितले.
त्याच्या घराच्या झडतीत दोन काडतुसे, लोड केलेले एक पिस्तूल मिळून आले. यानंतर मदनेला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात आली. यामध्ये त्याने पिस्तूल व काडतुसे भंडलकर याच्याकडून ४० हजाराला विकत घेतल्याचे सांगितले.
त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी बारामती तालुक्यातील खोडस येथे जाऊन भंडलकर यास ताब्यात घेतले. त्याच्या घरझडतीत एक गावठी पिस्तूल व चार काडतुसे सापडली. त्याचे रेकॉर्ड तपासले असता, तो ग्रामीण भागातील सराईत गुंड असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्या दोघांकडून दोन गावठी पिस्तुले, दहा काडतुसे आणि एक स्विफ्ट कार असा साडेतीन लाखांचा ऐवज हस्तगत केला. ही कारवाई पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव, सहायक पोलिस फौजदार युसूफ पठाण, पोलिस हवालदार रोहिदास लवांडे, पोलिस नाईक श्रीकांत शेंडे, पोलिस शिपाई अमित कांबळे यांच्या पथकाने केली.







