मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद आता मिटला असून मेघराज राजेभोसले यांच्याच नावावर पुन्हा एकदा संचालक मंडळाने विश्वास ठेवला आहे. यापुढेही अध्यक्ष म्हणून राजेभोसलेच काम पाहणार आहेत.
नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या कार्यकारिणी बैठकीत अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. ज्यात बारा संचालकांपैकी आठ संचालकांनी राजेभोसले यांच्या राजीनाम्याची मागणी करीत अविश्वास मांडला होता. त्यावेळी प्रभारी अध्यक्ष म्हणून विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची निवड करण्यात आली होती. त्यावेळेस लवकरच पुढील बैठक घेऊन नवीन अध्यक्ष निवडले जातील असे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी सांगितले होते.
मात्र बुधवारी ( ९ डिसेंबर 2020) रोजी मुंबई येथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये संचालकांनी पुन्हा एकदा मेघराज राजेभोसले यांच्यावरच विश्वास ठेवला असून पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून राजेभोसले यांनाच पसंती दिली आहे.







