ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – नववर्षांच्या निमित्ताने जिल्ह्य़ातील हॉटेल आणि ढाब्यांवरून होणारी छुपी मद्यविक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई सुरू केली आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवडय़ांत या विभागाने ८१ जणांवर कारवाई करून १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई डिसेंबरअखेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्य़ात दरवर्षी नाताळ आणि नववर्षांच्या स्वागतानिमित्ताने विविध पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी परवाने नसतानाही काही हॉटेल आणि धाब्यावर बेकायदापणे मद्यविक्री होत असते, तर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात हातभट्टय़ा चालविल्या जातात. परवाना नसतानाही मद्यविक्री होत असल्याने राज्याच्या महसुलावरही त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाने आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सकाळ, दुपार आणि रात्रीच्या सत्रात तीन विशेष पथके तयार केली आहेत. या प्रत्येक पथकामध्ये एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि चार कर्मचारी आहेत. या पथकांकडून ठाण्यातील येऊर, घोडबंदर, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर तसेच ग्रामीण भागात गस्त घालण्यात येऊ लागली आहे. या भागात १ ते १३ डिसेंबर या कालावधीत परवाना नसतानाही मद्याची छुपी विक्री करणाऱ्या आणि मद्याचे सेवन करणाऱ्या ८१ जणांवर पथकांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पथकांनी १९ लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला आहे
ठाणे जिल्ह्य़ातील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या येऊर भागात मुंबई- ठाण्यातील अनेक जण ३१ डिसेंबर रोजी पाटर्य़ासाठी येत असतात. हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असूनही या ठिकाणी ढाबे उभारले गेलेले आहेत. या ढाब्यांवर मोठय़ाने संगीत वाजविले जाते. या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स आणि ढाब्यांवर ठरावीक क्षमतेत जेवणासाठी येणाऱ्यांना परवानगी आहे. मात्र, अनेक ढाब्यांवर छुप्या पद्धतीने मद्यविक्री केली जाते. त्यामुळे या ढाब्याच्या परिसरात उत्पादन शुल्क विभागाकडून रात्री गस्त घातली जात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनही प्रवेशद्वारावर तपासणी सुरू आहे. वर्तकनगर पोलिसांकडूनही कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.







