मनमाडमध्ये एका रात्रीत सात दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये घबराट

manmad-thief

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) – रविवारी मध्यरात्री मनमाड शहरांतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, दत्त मंदीर रोड आणि भगतसिंग मैदान रोड अशा गजबजलेल्या परिसरातील सात दुकानांमध्ये धाडसी चोरीचा प्रयत्न झाला. यात दुकानांतील रोख रक्कम व किरकोळ सुटे पैसे असा सुमारे दहा हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. दरम्यान भर बाजारपेठेत एकाचवेळी एकात्र रात्री झालेल्या या घटनेने शहरांत खळबळ उडाली आहे.

 

शहराच्या भर बाजारपेठेसह विविध नागरी वस्त्यांमध्येही भुरटया चोरांचा उपद्रव मोठया प्रमाणावर वाढला आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक कडक करावी अशी मागणी नागरीकांतून होत आहे. सोमवारी सकाळी व्यापारी, दुकानदार नेहमी प्रमाणे आपली दुकाने उघडण्यासाठी आली असता या धाडसी चोरीच्या घटना घडल्याचे उघडकीस आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात, दत्त मंदीर रोडवर, गौरी मेडीकल या दुकानाचे कुलूप तोडून दुकान उघडण्याचा प्रयत्न झाला.

 

येथे शेजारी असलेल्या आदर्श सायकल या दुकानाचे शटर वाकवून गल्ल्यांतील पैसे चोरून नेले, मात्र दुकानात असलेल्या नव्या-कोर्या सायकली व इतर वस्तूंना हात लावला नाही. येथूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या राजकमल इलेक्ट्रॉनिक या दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला. तसेच दत्त मंदीर रोडवर भावना फरसाण आणि नम्रताप्रोव्हीजन या दुकानांचेही कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. भगतिंसग मैदान रोडवर अनुप प्रोव्हीजन या दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यांतील 5 हजार रूपये व किरकोळ सुटे पैसे चोरीस गेले.

 

ओम पान स्टॉल या दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला. पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव महांगरे, उपनिरीक्षक जी.एस.सोनवणे आदींच्या पथकाने घटनास्थळी जावून माहिती घेतली. दरम्यान, हा सर्व भाग अहोरात्र वर्दळीचा आहे. मात्र तरीही चोरांनी धाडस करत 7 ठिकाणी कुलूपे तोडून चोरीचा प्रयत्न केल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी गस्त अधिक कडक करावी, अशी मागणी व्यापारी व नागरिकांतून होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here