मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – रात्रीच्या वेळी तलवारी घेऊन फिरणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी सोमवारी रात्री गोवंडीच्या टाटा नगर परिसरात गेलेल्या एका पोलीस शिपायावर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
विनोद म्हात्रे (वय ५०) असे या जखमी पोलीस शिपायाचे नाव असून ते देवनार पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सोमवारी रात्री ते टाटा नगर येथील बीट चौकीत गस्तीवर असताना त्यांना दुचाकीवरून तिघेजण हातात तलवारी घेऊन येत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात याची माहिती देत, या तिघांचा पाठलाग सुरू केला. मात्र आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी म्हात्रे त्यांना पकडण्यासाठी पुढे गेले असता, आरोपीनी त्यांच्याजवळ असलेल्या बियरच्या बाटलीने त्यांच्या चेहऱ्यावर अनेक वार केले. यातील हसमतअली शेख (वय १९) या आरोपीला या शिपायाने पकडून ठेवले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी म्हात्रे यांना रुग्णालयात दाखल केले.







