केरळमध्ये शिगेल्ला जंतूच्या प्रादुर्भावाने २० बाधित; एकाचा मृत्यू..

shigella-infection

कोळीकोड (केरळ) – केरळच्या कोळीकोड जिल्ह्यामध्ये शिगेल्ला जंतूची बाधा झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. शुक्रवारी जिल्ह्याच्या कोट्टामपारंबा आणि मुंडीक्कालताळम भागामध्ये मिळून असे २० रुग्ण आढळून आले. तसेच, आतापर्यंत यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाने दिली.

यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री व्ही यांनी लोकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, जिल्ह्याच्या विविध भागांमधील पाण्याचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यासोबतच जिल्हा निगराणी अधिकाऱ्यांच्या एका पथकानेही ज्या भागात रुग्ण आढळले आहेत तेथली तपासणी केली आहे. याठिकाणी स्वच्छतेची कशा प्रकारे व्यवस्था आहे, आणि या जंतूचा प्रसार कसा थांबवता येईल याबाबत हे पथक तपास करत आहे.
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनीही युद्धपातळीवर काम करत विहिरी आणि इतर पाण्यांच्या साठ्यांचे क्लोरिनेशन सुरू केले आहे. यासोबतच, आरोग्य पथक सध्या घरोघरी जात याबाबत जनजागृती करत आहेत. तसेच, आरोग्य विभागामार्फत अंगणवाड्यांमध्ये ओआरएसच्या पाकिटांचेही वितरण करण्यात येत आहे.

शिगेल्ला जंतूचा संसर्ग झाल्यास तीव्र पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि विष्ठेसोबत रक्त येणे अशी लक्षणे दिसून येतात. या जंतू थेट आतड्यावर हल्ला करत असल्यामुळे ही लक्षणे दिसून येतात. याचा प्रसार हा दूषीत पाण्यातून, आणि शिळ्या अन्नातूनही होतो. या आजारामुळे मृत्यू होण्याचा धोका हा पाच वर्षांहून लहान मुलांमध्ये अधिक असतो. मात्र, वेळीच उपचार घेतल्यास हा धोका टाळता येतो. याचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे याबाबत अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे असते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here