शिर्डी (प्रतिनिधी) – आंतराष्ट्रीय किर्तीचे तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीतून दिप्ती सोनी या गायब झाल्यानं मानवी तस्करी होत असल्याची शंका उपस्थित करणारे इंदौर येथील साईभक्त मनोज सोनी यांची पत्नी रहस्यमयरित्या इंदौरमध्येच मिळून आली. तीन वर्षांपूर्वी शिर्डीतून गायब झालेल्या दिप्ती सोनी या त्यांच्याच सख्खी बहीण किर्ती सोनी यांना 17 ऑगस्ट 2020 रोजी इंदौर येथील नंदानगर भागात मिळून आल्या आहेत. शिर्डी पोलिसांनी तक्रारदार मनोज सोनी, मिसींग दिप्ती सोनी आणि त्यांची बहीण किर्ती सोनी या तिघांना पुढील कार्यवाहीसाठी शिर्डीत आणले आहे.
दि. 10 ऑगस्ट 2017 रोजी मनोज सोनी, मुले आणि पत्नी दिप्ती सोनी हे शिर्डीला साईबाबा दर्शनासाठी आले होते. याच दरम्यान दिप्ती सोनी या शॉपींग करण्यासाठी दुकानात गेल्या असता तेथून त्या गायब झाल्या होत्या. याबाबत मनोज सोनी यांनी शिर्डी पोलिसांत पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.अनेक दिवस उलटून गेले तरी आपली पत्नी मिळत नसल्यानं मनोज सोनी यांनी शिर्डीत हरवलेल्या व्यक्तींची माहितीच्या अधिकारात माहिती मिळवून मुंबई उच्च न्यायालयालयाच्या औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली. या दरम्यान न्यायालयाने शिर्डीतून मानवी तस्करी होते का? असं निरिक्षण नोंदवत पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले.
मात्र तरीही दिप्ती मिळून न आल्यानं उच्च न्यायालयाने पोलीस तपासाविषयी नाराजी व्यक्त करत राज्याचे डीजीपी यांनी मानवी अंगाची तस्करी या दिशेने तपास करावा असे सुचित केले होते. आता तीन वर्षांनंतर शिर्डीतून हरवलेली दिप्ती अचानक रहस्यमयरित्या तिच्याच बहिणीच्या घरावजवळ इंदौर येथे मिळून आली. याच दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले हे आपल्या टीमसह इंदौर येथे तपास करण्यासाठी गेले असता परतीच्या प्रवासादरम्यान पती मनोज सोनी याने संपर्क करून दिप्ती मिळून आल्याची माहिती सांगितली. आपली पत्नी शिर्डीतून हरवली होती. ती इंदौर येथे कशी पोहचली याचा तपास व्हावा, अशी मागणी मनोज सोनी यांनी केली आहे.







