एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या एपीआयला लाच घेतांना अटक

API-sandeep-hajare

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – रायपुर येथील दोन गटात झालेल्या वादात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 30 हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप अशोक हजारे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सायंकाळी अटक केली.

तालुक्यातील रायपूर येथे दीड महिन्यापूर्वी दोन गटात वाद झाला होता. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन मारहाण, दंगल व इतर कलमांन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हयाचा तपास सहायक निरीक्षक संदीप हजारे यांच्याकडे होता. याप्रकरणात मदत करण्यासाठी हजारे यांनी संबंधित व्यक्तीकडे 30 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत तरुणाने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, किरण रासकर, हवालदार सचिन गोसावी, मनोज पाटील, किरण अहिरराव व जाधव यांच्या पथकाने शनिवारी जळगाव गाठून तक्रारदार व हजारे यांची चौकशी केली. तांत्रिक पुरावे उपलब्ध झाल्याने हजारे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई केली.

सकाळी 11 वाजेपासून सुरु असलेली कारवाईची प्रक्रीया रात्री आठ वाजेपर्यंत सुरु होती. याप्रकरणी हजारे यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या पोलीस ठाण्यात हजारे कार्यरत होते, त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन कोठडीत जाण्याची वेळ हजारे यांच्यावर आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here