जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जिल्ह्यातील मुक्ताईनगर,चाळीसगावसह चार तालुक्यात शालेय पोषण आहार गैरव्यवहारप्रकरणी तक्रारदार रवींद्र शिंदे यांनी गेल्या काही महिन्यापासून पाठपुरावा सुरू असून यात बनावट शिक्के व कागदपत्रांचा देखील वापर झाला आहे.
त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण गृहमंत्र्यांकडे केली असून त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देखील दिले आहेत, अशी माहिती माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. बीएचआर, मविप्र यासह शालेय पोषण आहार घोटाळ्याचे प्रकरण जळगाव जिल्ह्यात गाजत असून सुनिल झंवर यांच्या कार्यालयात शिक्षण विभागाचे बनावट शिक्के सापडल्याने पुन्हा शालेय पोषण आहार चर्चेत आला आहे.
या प्रकरणी खडसे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, या प्रकरणात मी स्वत: सीईओंना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र, कुणाचा तरी दबाव असल्याने त्यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे आपण स्वत: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कारवाईबाबत पत्र दिले आहे. मात्र, यात बनावट शिक्के व कागदपत्रांचा वापर झाला असल्याने आपण गृहमंत्र्यांना कारवाईबाबत विनंती केली आहे. तसेच तक्रारदार रवींद्र शिंदे यांच्याकडील पुराव्यानिशीचे कागदपत्र देखील दिली आहेत. याबाबत गृहमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.







