रात्रीस खेळ चाले – वाळू वाहतुकीचा; दोन दिवसात ७० वाहनांवर कारवाई

नंदुरबार (जगदीश ठाकुर) – लॉकडॉउनमुळे गेल्या चार महिन्यांपासून जिल्हाबंदी लागू आहे. याच लॉकडॉऊनचा फायदा घेत काही वाळू वाहतूकदारांच्या दृष्टीने वाळूला सोन्याचाच दर आला आहे आणि कमाईची ही सुवर्णसंधी घेण्यासाठी “रात्रीस खेळ चाले’ या पद्धतीने वाळू वाहतूक सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नंदुरबार जिल्हा हद्दीमार्गे वाळू वाहतुकीला बंदी केली असतानाही वाळूमाफिया मध्यरात्रीची संधी साधत नंदुरबार जिल्हा मार्गे इतर जिल्ह्यात वाळूची सर्रासपणे वाहतूक करीत आहे. गेल्या चार दिवसात अनेक ठिकाणी महसूल व पोलीस विभागाने कारवाई केली. तर नंदुरबार तालुका हद्दीत सहाय्यक जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यासह पथकाने रात्रीच्या वेळी वाहतूक होणाऱ्या वाळूच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. आतापर्यंत ८० हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही मध्यरात्रीच्या वाळू वाहतुकीला लगाम लागत नाही. गुजरात राज्यातील वाळू नंदुरबार जिल्हा मार्ग वाहतूक केली जात आहे. अखेर वाळू वाहतुकीला रोखण्यासाठी पथकाची प्रशासनाने नियुक्ती केली आहे. त्यामुळे वाळू वाहतुकीला लगाम लागेल काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पहाटे किंवा मध्यरात्रीच हे वाळूचे ट्रक कसे येतात व कोठून येतात, हे उघड असल, तरी जिल्हा मार्गे होणारी वाळू वाहतूक सर्रासपणे सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यात वाळू उपशाला बंदी आहे. मात्र नजीकच्या गुजरात राज्यात उपसा सुरु असल्याने येथील वाळू डंपर व ट्रकांद्वारे औरंगाबाद, नाशिक, जालना, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये नंदुरबार जिल्हा मार्गे वाहतूक केली जात आहे. बांधकाम प्रक्रियेत वाळू सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यात वाळू उपशावर बंदी असल्याने सातत्याने तिला मागणी आहे. त्यामुळे पुरवठा कमी व मागणी जास्त आहे आणि त्यातून काही जणांनी चोरट्या वाहतुकीचा मार्ग अवलंबला आहे. तस्करी म्हटले की त्यात बेकायदेशीर घडामोडी आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात गेल्या चार महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन आहे. तर जिल्हा व आंतरजिल्हा देखील बंदी करण्यात आली आहे. असे असतानाही नंदुरबार जिल्हा मार्गे गुजरात राज्यातील वाळूची वाहने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सर्रासपणे रात्रंदिवस जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या एक महिन्यांपूर्वीच आदेश जारी करून वाळूची वाहने नंदुरबार जिल्हा हद्दीमार्गे जाण्यास बंदी घातली आहे. परंतु या आदेशाला वाळू माफियांकडून केराची टोपली दाखविण्यात येत असून रात्रंदिवस वाळूची वाहतूक सुरू आहे. तसेच काही वाळू वाहतूकदार दिवसा कमी प्रमाणात वाळू वाहतूक करीत आहेत त्याऐवजी ते रात्रीची संधी साधून अनेक ट्रकांमध्ये हजारो ब्रॉसची वाळू भरून नंदुरबार जिल्हा मार्गे वाहतूक करीत आहे. त्यामुळे या बाळू वाहतूकदारांनी आता मध्यरात्रीची संधी साधत वाळू वाहतुकीचा रात्रीतून खेळचाले असाच डाव साधला आहे असे असले तरी सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत व नंदुरबारचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका व उपनगर पोलीसांनी दोन दिवसांपूर्वीच नंदुरबार तालुकामार्गे गुजरात राज्यातून आलेली वाहने इतर जिल्ह्यात वाळू वाहतूक घेऊन जात असताना त्या वाहनांवर कारवाई केली. यात तब्बल वाळूची ५० वाहने जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतूकदारांना खळबळ उडाली. असे असले तरी अद्यापही ठोस कारवाईची गरज आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर व शहादा या ठिकाणीही महसूल विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे रात्रीतून वाळूची वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना लगाम लावण्यासाठी अद्यापही ठोस कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here