स्टेट बँकेच्या भंडारा शाखेत ३२ लाखांची चोरी

bhandara-state-bank

खिडकी तोडून गॅस कटरने तिजोरी कापली

भंडारा – खिडकी तोडून गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून सुमारे ३२ लाख रुपये रोख चोरट्यांनी लंपास केली. ही घटना स्टेट बँक शाखा सानगडी येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.

सानगडी येथील पोलिस चौकीपासून काही अंतरावर गोविंदराव ब्राम्हणकर यांच्या घरासमोरील इमारतीत स्टेट बँकेची शाखा आहे़. सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्टेट बँक शाखेची मागील खिडकी तोडून आत प्रवेश केला. गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी फोडून ३२ लाख रुपये घेऊन पसार झाले. सदर तिजोरीत सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असल्याची माहिती आहे.

बँक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस उपअधीक्षक काटे, जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अपर अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळाला भेट दिली. श्वानपथक व फिंगरप्रिंट एक्सपर्टनी शोध मोहीम सुरू केली. दर बँकेचे शाखा व्यवस्थापक गोंदियावरून तर इतर कर्मचारी साकोली, भंडाऱ्यावरून ये-जा करीत असल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी बँकेत सुरक्षा व्यवस्थेसाठी चौकीदार नव्हता़ मुख्य दाराच्या किल्ल्या साफसफाई व स्वच्छतेसाठी रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्याकडे ठेवल्या जात असल्याचा आरोप या घटनेनंतर होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here