माणदेशी बकरा,बोकडाच्या मटणाला आणि पाळीव खिलार जनावरांना जी आय मानांकन द्या – सादिक खाटिक

सांगली (स्वप्निल कारेकर) – देशात सर्वोतम चव,दर्जा आणि प्रचंड प्रमाणात उपलब्ध होवू शकणाऱ्या बोकडे बकरे या लहान जनावरांच्या माणदेशी मटनाला आणि शेतीच्या कामासाठी, दुधासाठी सर्वोतम असणाऱ्या माणदेशी मोठ्या पाळीव खिलार जनावरांना जी आय मानांकन देवून लहान मोठ्या जनावरांसाठी विविध योजना, उपाय करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या मागणीच्या निवेदनाच्या प्रति ईमेल द्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील ,कृषी मंत्री दादाजी भुसे, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार,सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील ,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दतात्रय भरणे यांना पाठविण्यात आल्या आहेत .
या विषयी सादिक खाटीक यांनी, पश्चिम महाराष्ट्रात सांगली , सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी तालुक्यांचा भाग — सातारा जिल्ह्यातील माण ,खटाव, सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहंकाळ , सोलापूर जिल्ह्यातील सांगोला , मंगळवेढा हे पूर्ण तालुके आणि माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील लगतचा भाग असा मिळून माणदेश प्रदेश म्हणून ओळखला जातो . माण नदी ही या सर्वांना जोडणारी एक मुख्य धारा आहे . दुष्काळी भागातील या तालुक्यांची संपूर्ण देशात ख्याती आहे ती उत्कृष्ट, चपळ, देखणे ,मजबूत, भारदस्त, मोठी खिलार जनावरे आणि सर्वोतम चव, दर्जा, मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या मटनासाठी उपयुक्त असे सर्वोतम , सर्वमान्य , सर्वप्रिय बोकड , बकरे ( बालंगे ), शेळ्या, मेंढ्या या लहान जनावरांचे क्षेत्र म्हणून . जगण्यासाठीची तीव्र धडपड आणि स्वच्छ हवामानातल्या खुरट्या वनस्पतीवर पोसले गेल्याने ही लहान जनावरे काटक, आरोग्यवर्धक आणि तितकीच पुरेशी मांसल, दणकट असतात . त्यामुळेच आसपासच्या जिल्ह्यांमध्ये माणदेशी लहान जनावरांच्या मटनाची बाजारपेठ पिढ्यान पिढ्या निर्माण झाली आहे. त्याचवेळी प्रचंड कष्ट , मेहनतीच्या, शेती कामासाठी , दुध उत्पादनासाठी उत्कृष्ट देशी वाण म्हणून खिलार गाई , बैल , खोंडाना संपूर्ण देशात मोठी मागणी आहे. मोठी खिलार जनावरे संवर्धनासाठी शासनाने मोठी पावले टाकली पाहीजेत , पशुपालकांच्या पाठीशी उभे रहात खिलार जनावरांसाठी म्हणून काही सोयी सवलती संरक्षण पुरेशा प्रमाणात आणि माफक किंमतीत चाऱ्याची खुराकाची व्यवस्था या माणदेशात उभी केली पाहीजे . असे स्पष्ट केले आहे .

आजच्या मार्केटींगच्या युगात इतके दर्जेदार छोट्या जनावरांचे (बोकडे बकरे वगैरे ) मटन देणारे आणि दमदार शेळ्या,मेंढ्या, बोकड,बकरे या लहान जनावरांचे आगर असणारे हे क्षेत्र स्पर्धेत प्रचंड मागे पडले आहे. इथला शेतकरी, पशुपालक , दुष्काळी असल्यामुळे त्यांच्या हातात हा व्यवसाय उभा करण्यासाठी पुरेसा पैसा नाही , मार्केटिगचे आधुनिक तंत्र त्यांना माहीत नाही आणि जवळपास त्याला न्याय मिळवून देईल अशी बाजारपेठ नाही . महाराष्ट्र शासनाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी काजू आणि आंब्याला , विदर्भात नागपूरी संत्र्याला , महाराष्ट्राबाहेर मोठ्या प्रमाणावर पिकणाऱ्या पण केवळ बाजारपेठ असलेल्या सांगली आणि नांदेडच्या हळदीला, उत्तर महाराष्ट्रातील केळी , द्राक्षांना जी आय मानांकन दिल्याचे आम्ही शेतकरी ऐकतो आहोत. माणदेशी लहान जनावरांच्या मटनाला आणि माणदेशी मोठ्या खिलार जनावरांना अशी मानांकने का मिळत नाही . असा आमच्या शेतकरी पशुपालकांना गेली अनेक वर्षे प्रश्न पडला आहे असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी या निवेदनात , माझ्या सारख्या कार्यकर्त्याने विचार केल्यावर असे लक्षात आले की माणदेशी मटनाच्या लहान जनावरांचे आणि माणदेशी मोठी खिलार जनावरे यांची जपणूक शेतकरी करीत असले आणि ते याला शेतीचाच भाग मानत असले तरी सरकारच्या लेखी हे पशुसंवर्धन आहे. त्यामुळे याला शेतमाल मानायचा की पशुधन मानायचे . जी आय मानांकन मागायचे कोणी असा प्रश्न निर्माण झाला असावा . महाराष्ट्र शासनाने या बाबीला गांभीर्याने घेऊन कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने माणदेशी लहान जनावरांच्या मटनाला आणि माणदेशी खिलार जनावरांना जी आय मानांकन मिळवून देण्याची गरज आहे . मात्र केवळ तेवढीच आमची मागणी नाही . माणदेशी लहान जनावरांच्या मटनाची विक्री व्यवस्था उभी करणे आणि शेतकऱ्याला या व्यवसायात स्वतः उतरून विकीचे तंत्र , देश – विदेशातील व्यवहार करणे आत्मसात होईपर्यत माणदेशाचे मुख्य केंद्र आटपाडी येथे या विषयांवर काम करणारे तीन जिल्ह्याचे एक कार्यालय सुरू करण्यात यावे, त्याच्या, माणदेशातल्या प्रत्येक तालुक्यात शाखा असाव्यात आणि कृषी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यावर नेमले जावेत . या अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांचे गट करून ही विक्री व्यवस्था निर्माण करणे , जनावरांचे लसीकरण , रोगांवरील उपचार , जागतिक बाजारपेठेत मागणी असणारे दर्जेदार मटन निर्मिती याबाबत शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. लहान जनावरांच्या तसेच मोठ्या खिलार जनावरांच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना उत्तम चारा निर्मितीसाठी पुरेसे पाणी, सवलतीच्या दरातला आणि २४ तास उपलब्ध होणारा वीजपुरवठा देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत केली पाहीजे. महाराष्ट्र शासनाने लहान जनावरांच्या मटनाचा हा राज्याचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून विकसीत केल्यास तीन जिल्ह्यातील दुष्काळी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत प्रचंड मोठा बदल घडू शकेल . दुष्काळी भागातील महिला , शेतमजूर यांना रोजगार मिळण्याबरोबरच पशुधन वाढीचे उद्दीष्ट सफल होवू शकेल . जगात आफ्रिका खंडातील देश , अरब राष्ट्रे श्रीलंका, बांगलादेश ,चीन वगैरे अनेक राष्ट्रांमध्ये फार मोठ्या लोकसंख्येला पुरेसे अन्न मिळत नाही . भारत सरकारचे या सर्व देशांशी व्यापार करार आहेत. आपण त्यांच्या कडून मोठी आयात करतो मात्र निर्यात फारच कमी आहे . एकट्या चीनला शेळ्या ,मेंढ्या, बोकडे ,बकऱ्यांचा पुरेसा मांस पुरवठा केला तरी सुद्धा या भागातला प्रत्येक शेतकरी कोट्याधीश होवू शकेल . एक समृद्ध व्यवस्था उभी केली तर भारताला यातून परकीय चलनही मिळेल , शेतकरी , जनतेबरोबर सरकारचाही फायदा होवू शकेल . जगातल्या १२ राष्ट्राशी औद्योगीक करार करून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने एक चांगला पाया रचला आहे. तसेच आम्ही सुचविलेला हा एक पर्याय महाराष्ट्राला जगात लौकीक मिळवून देणारा ठरेल आणि दुष्काळी माणदेशी शेतकरी समृद्ध होईल .याचा गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा ही शेवटी त्यांनी व्यक्त केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here