बाळासाहेब ठाकरे की दि. बा. पाटील; नवी मुंबई विमानतळाचा नामांतर प्रश्न चर्चेत

navi-mumbai-airport

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे काम सिडकोच्या माध्यमातून प्रगतिपथावर असून या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मात्र या मागणीला नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शविला आहे. नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी करण्यात येत असून याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सर्वांनाच नितांत आदर आहे, परंतु नवी मुंबई विमानतळासाठी दि. बा पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. नवी मुंबईची उभारणी करताना भूमिपुत्रांच्या जमिनी सिडकोने सक्तीने संपादित केल्या. त्यावेळी भूमिपुत्रांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी दि. बा. पाटील यांनी लढा उभारला आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले. आज भूमिपुत्रांना मिळणारा मोबदला दि. बा. पाटील यांच्याच त्यागामुळे मिळाला आहे. मात्र आतापर्यंत नवी मुंबईत उभ्या राहिलेल्या कोणत्याच मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता उभ्या राहत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव मिळावे, अशी भूमिपुत्रांची इच्छा आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या नामांतर प्रश्नाचे राजकारण होऊ नये, अशी भावना प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई विमानतळासाठी दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुरवातीपासूनच केली जात आहे. या मागणीला येथील राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी विमानतळास बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केल्याने हा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे. महाराष्ट्रात अनेक प्रकल्पांना बाळासाहेबांचे नाव देण्यात आले आहे. नवी मुंबईची उभारणी करताना भूमिपुत्रांच्या जमिनी सिडकोने सक्तीने संपादित केल्या. त्यावेळी भूमिपुत्रांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी दि. बा. पाटील यांनी लढा उभारला आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले. असे असताना नवी मुंबईत उभ्या राहिलेल्या कोणत्याच मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव द्यावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here