पुण्यातील चोरांना पाहून पळणारे दोघे पळपुटे पोलिस निलंबित

maharashtra-police

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – स्वतःकडे रायफल असूनही चोरट्यांचा पाहून पळ काढणाऱ्या पुण्यातील दोन पळपुट्या पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पळून जात असल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल होत होता त्यामुळे पुणे पोलिसांची नाचक्की झाली. कर्मचाऱ्यांच्या या वर्तनाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, दोघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

प्रवीण रमेश गोरे व अनिल दत्तू अवघडे अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिले आहेत. सोसायटीत चोरी होत असल्याची माहिती मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर, हे दोन्ही बीट मार्शल घटनास्थळी पोहोचले होते. त्यावेळी त्यांचा सामना सोसायटीतून बाहेर पडणाऱ्या चोरट्यांशी झाला. चोरट्यांच्या हातातील कोयते व कटावणी पाहून, दोघांनी तेथून पळ काढला. दरम्यान, बीट मार्शलकडे एसएलआर रायफल असतानादेखील त्यांनी चोरट्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला नाही.

एवढेच नाही तर चोरटे पळून गेल्यानंतर त्यांनी याची माहिती वॉकीटॉकी किंवा मोबाईलद्वारे कळवली नाही. चोरटे सुरक्षा रक्षकाला मारहाण करून किंमती ऐवज घेऊन गेले. त्यामुळे दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here