अहमदनगर (प्रतिनिधी) – जेंव्हा हिंदुस्थानावर मुघलांच्या आक्रमणाच सावट होत,
अनन्वित अत्याचार, कत्तली होताना छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या, रयतेच्या रक्षणासाठी मुघलांविरुद्ध सतत दोन हात केले.
रयतेला हक्काची जाणीव दिली. त्यांना सन्मान दिला.
या संघर्षाच्या काळात आपल्या मावळ्यांच्या साथीनं अनेक किल्ले निर्माण केले.
हेच किल्ले आज उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा, जाज्वल्य देत उभे आहेत.
आपल्या अभिमानाची प्रतिके आहेत ती..
आपल्या पूर्वजांचा समृध्द, स्वाभिमान जगण्याचा संस्कार देणारा वारसा आहेत हे किल्ले..
महाराजांचे स्मरण, त्यांना वंदन केल्याशिवाय राज्या च्या कारभाराला सुरुवात होत नाही..
राज्याच्या इतिहासाची ओळख देणारे ,महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आपले किल्ले आपल्याला प्रेरणा देणारी मंदिरेच आहेत.
तरुणाईला संस्कार देणाऱ्या या किल्ल्यांचे संवर्धन, सुशोभीकरण व्हावे. अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा शिरसावंद्य मानत राज्य सरकार,केंद्रसरकारने अनेकदा मोठ्या निधीची घोषणा केली.
पण,
आजही ज्या किल्ल्यांच्या मातीची धूळ कपाळाला लावावी व महाराजांचं स्मरण करावं. आज तिथली काय स्थिती आहे??
तर तिथली एव्हढीच स्थिती आहे की,
शौर्याचा इतिहास, अन् मानबिंदू असलेल्या या वास्तू दुर्लक्षित असल्याकारणाने पडझडीचे जिणे जगत आहेत.
इतिहासातील अनेक समृध्द क्षणांचे साक्षीदार असलेल्या या किल्ल्यांना आपली झालेली पडझड पाहून वेदने चे दिवस जगत आहेत ?.
निर्मात्यांनी इथला प्रत्येक दगड रचताना किती काळजी घेतली असेल..
आपल्या राज्याच्या कल्पनेतील, स्वप्नातील..
किल्ला बांधतांना किती अभ्यास झाला असेल,
हजारो हातांना इथल्या वास्तू घडविताना नक्कीच तृप्तीच समाधान मिळालं असेल…
हे किल्ले आपल्या शक्तीची तीर्थस्थळ आहेत.
एकतेची प्रतिके आहेत..
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारात येताना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र आपल्या नजरेस पडते व आपले हात आपोआप जुळतात.
ज्यांचे नाव घेवून प्रत्येक पक्षाचे नेते निवडणुका लढवितात.. (यात सारेच पक्ष आले..)
पण पुढे काय होते..
छत्रपतींनी दिलेल्या आदर्शाचे आपण किती अनुकरण करतो,,
त्यांनी निर्माण केलेल्या स्थळांच्या संवर्धनाचे भान तरी आपल्याला आहे का??
इतर राज्यात ऐतिहासिक वास्तूंची जी निगा राखली जाते, जे संवर्धन होतें, या प्रमाणात आपण आपल्या या वास्तूं ची आजपर्यंत कोणती काळजी घेतली..?
आज अलिबाग येथे महाराजांचा समुद्रातील किल्ला पाहण्याच भाग्य लाभलं, तिथली भवानी मंदिर, गणपती मंदीर, शिव मंदिर पाहिली.. किल्ल्याचे निखळलेली बुरूज पाहताना, मोठी पडझड झालेली पाहून गलबलून गेलो…
महाराज आपल्यासाठी जे ठेवून गेले. त्याची किती प्राणपणाने, अभिमानाने, कृतज्ञतेने काळजी, देखभाल करतो आपण…? हे पाहून शरमेने मान खाली गेली…
हा किल्ला राष्ट्रीय स्मारक आहे आज..
पण स्मारक म्हणून कोणता जीर्णोद्धार झाला याचा..?
पर्यटकांना, इतिहास प्रेमींना कोणता इतिहास जाणून घेता आला?
रचलेला एकेक दगड निखळत आहे..
पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास लोप पावतो आहे..
राज्य चालवणारे नेते महाराजांच्या पुतळ्यास जयंतीला पुष्पहार घालण्यापुरते आठवण करतात का??
की या दिवशी मोठमोठ्या घोषणा करून टाळ्या मिळण्या पुरते महाराज आहेत ?
आपण आपल्या लाडक्या छत्रपतींच्या पुण्याईने इथे राहत आहोत याचं भान आपल्याला आहे का?
त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात राहत आहोत..
याचं स्मरण ठेवा हीच हात जोडून विनंती..
किल्ले ही आपली शक्तीस्थळे आहेत…
इतिहास विसरू नका,
भविष्याकडे वाटचाल करताना इतिहासाची जाण ठेवली नाही तर वर्तमान आपल्याला माफ करणार नाही.
परदेशात हे किल्ले असते तर त्या लोकांनी किती जपल्या असत्या अशा वास्तू… हे सांगायची गरज नाही…
केवळ मोठ्या घोषणा करायच्या ही तर आपल्या प्रत्येक नेत्याची फॅशन झाली आहे. मग तिथे सारेच पक्ष आलेत..
राज्यांच्या या निर्मात्याच्या त्यागाची, शौर्याची, धगधगत्या इतिहासाची जाणीव ठेवा.. श्रद्धा ठेवा..
जनता तुमच्याही अंगावर फुले उधळेल..
जयंत येलुलकर, मा. नगरसेवक
अध्यक्ष, रसिकग्रुप,अहमदनगर/ 9822096961







