सोलापूर (प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – सध्याच्या डिजिटल युगात लग्न जुळवण्याची पारंपरिक पद्धतही ऑनलाइन झाली आहे. लग्न जमवण्याच्या जुन्या पद्धतीमध्ये मध्यस्थ असायचा. मात्र, या ऑनलाइन पद्धतीत मध्यस्थांची जागा हिरावली. या पार्श्वभूमीवर मॅट्रिमोनी साइट्स सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पंढरपूरमध्ये घडलेल्या प्रकारावरून पडला आहे. मुंबई येथील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या विवाह संस्थेकडून पंढरपूर तालुक्यातील विवाहासाठी इच्छुक 17 वरांकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पंढरपूर तालुक्यातील सुस्ते या गावातील शहाजी शिवाजी शिंदे या वराने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
राज्यामध्ये विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. यामध्ये समाज माध्यमांतून वधू-वराची निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. अशाच प्रकारची मुंबई येथील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या विवाह विषयक संस्थेकडून समाज माध्यमातून जाहिरात करण्यात आली होती. या विवाह संस्थेतील राजन पाटील आणि सचिन बनसोडे यांच्यासोबत शहाजी शिंदे यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्या ओळखीत शिंदे यांना पैसे व नोकरीचे आमिष दाखवण्यात आले. त्यांना आसपासच्या परिसरातील नववधू व वर यांच्या विवाह नोंदणी संदर्भात कामे देण्यात आली. त्या पद्धतीने विवाह संस्थेच्या अटीनुसार शहाजी शिंदे यांनी सुस्ते या गावातील तरुणांची विवाह संदर्भ नोंद केली.
‘नवरी मिळे नवऱ्याला’ या विवाह संस्थेकडून सुस्ते गावातील तरुणांना सुंदर वधूंचे फोटो पाठविण्यात आले. वधूंचे फोटो व मोबाईल नंबर शहाजी शिंदे यांना देण्यात आले. त्यानंतर त्या वधूंशी बोलणे सुरू झाल्यानंतर चार तरुणांचे विवाह जमवण्यात आला. दरम्यान, वधुसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदी करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये कपाट, सोने, कपडे याची खरेदी करण्यासाठी पैसे मागण्यात आले. शहाजी शिंदे यांनी स्वतःच्या व मित्रांच्या लग्नात लागणाऱ्या वस्तुंच्या खरेदीसाठी दोन लाख रुपये राजन पाटील यांना ऑनलाइन पाठवले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याची तारीख विवाहासाठी ठरविण्यात आली. त्यानंतर नोंदणी संस्थेकडून नोव्हेंबरमधील विवाह तारीख उलटूनही कोणताच संपर्क होऊ शकला नाही. नोंदणी संस्थेकडून दिलेले संपर्क नंबरही बंद ठेवण्यात आले. राजन पाटील व सचिन बनसोडे यांच्याशी शहाजी शिंदे यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. त्यांचाही नंबर बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. ‘नवरी मिळे नवऱ्या’ला या संस्थेतील राजन पाटील व सचिन बनसोडे यांच्याविरुद्ध शिंदे यांनी तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला आहे.
शहाजी शिंदे व श्याम शिंदे यांनी ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या विवाह नोंदणी संस्थेच्या विरोधात तक्रार दाखल केली. पंढरपूर तालुक्यात 17 युवकांना या माध्यमातून फसवण्यात आल्याची बाब समोर आली. या 17 युवकांकडून सुमारे सात लाखांपर्यंतची लूट करण्यात आल्याचे समजत असून फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.







