ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. शिवाय या सेलिब्रेशनवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन ड्रोन कॅमेराची मदत घेणार असल्याची माहिती पोलीस परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भव जास्त प्रमाणात झाला आहे. महाराष्ट्र सरकारने देखील नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली आणि परिमंडळ तीन परिसरात कुठेही रात्री अकरानंतर पाचपेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊन कोणतेही नववर्षाचे स्वागत किंवा इतर कार्यक्रम करू नये यासाठी काटेकोर नियोजन आणि बंदोबस्त लावले आहे. त्यानुसार दुर्गाडी नाका, गांधारी नाका, शहाड ब्रिज, पलावा ब्रिज, बदलापूर नाका आणि टाटा पावर हाऊस नाका या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणांवर बारकाईने सर्व वाहन चालक आणि प्रवासी यांची मद्यसेवन आणि इतर तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोना संबंधीच्या मास्क आणि इतर बाबतची तपासणी देखील होणार असून, सोसायटीच्या आवारात किंवा टेरेसवर एकत्र येऊन सेलिब्रेशन होऊ नये यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात येणार आहे. शिवाय तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी 20 विशेष पोलिसांचे पथक गस्त घालणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.







