सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – मारहाणीत जखमी झालेल्या सैदापूर ( ता. सातारा) येथील जवानाचा उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरुन अज्ञातावर पुण्यात गुन्हा नोंद झाला आहे. त्यानंतर झिरोने गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे.
संदीप पवार (रा. सैदापूर) असे मृत सैनिकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, संदीप पवार यांची पत्नी चेतना पवार यांनी फिर्याद दिली आहे. संदीप पवार हे सैनिक होते. सध्या ते सुट्टीवर होते. २७ डिसेंबरला संदीप पवार यांना मारहाण झाली होती. बेदम मारहाण झाल्याने ते जखमी अवस्थेत घरी आले. त्यांच्या हाता पायातून रक्त वाहत होते. गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
मृत जवान संदीप पवार यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर तो सातारा तालुका ठाण्यात वर्ग झाला आहे. पोलिसांनी मारहाणकर्त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. सातारा तालुका पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे शाखाही खुन्याचा शोध घेत आहे.







