बापाची निर्घृण हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

thane-court

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ७० वर्षीय बापाची निर्घृण हत्या करणाऱ्या मुलाला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश आर. एम. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सुरेश धर्मा धिंडा (वय ५३) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पेंढारीपाडा-बामणगाव येथे १७ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती.

आरोपी सुरेश धर्मा धिंडा याला मृत वडील धर्मा शंकर धिंडा यांनी १७ डिसेंबर २०१७ रोजी शेतात काम करण्यास सांगून शिवीगाळ केली होती. याच रागातून आरोपी सुरेशने घरात ठेवलेल्या लोखंडी कोयत्याने बापावर हल्ला केला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यांनतर सुरेश पोलिसांच्या भीतीने घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता एका गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला पाली गावातील एका मासेमारी बोटीवरून अटक केले होते.

या गुन्ह्यात भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन एपीआय राजीव पाटील आणि त्यांच्या पथकाने आरोपी सुरेशला अटक केली होती. आज हत्येप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन वयोवृद्ध बापाची निर्घृण हत्या केल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वला मोहळकर यांनी युक्तीवाद केला. तर भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन एपीआय राजीव पाटील, सा. पोलीस उपनिरीक्षक राजपूत, तोरणे, पोलीस नाईक भरत शेगर, राजेंद्र शेंद्रे, कैलास वाढविंदे, आणि जयेश मुकादम या पोलीस पथकाने वेळोवेळी सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केल्याने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here