शाळेची फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांने केली लूटमार

thief

रुद्रपूर (उत्तराखंड) – शाळेची फी भरण्यासाठी विद्यार्थ्याने लूटमार केल्याची घटना उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये घडली आहे. कोरोना महामारीच्या काळात आपल्या वडिलांची पगारकपात करण्यात आली. त्यामुळे आपण शाळेची फी भरू शकत नव्हतो. शाळेची फी भरण्यासाठी आपण काही मित्रांसोबत कॅश मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्याला लुटल्याचे विद्यार्थ्याने चौकशीत सांगितले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

कॅश मॅनेजमेंट कंपनीतील कर्मचारी सचिन शर्मा यांच्याकडून काहीजणांनी 5 लाख 35 हजारांची रक्कम लुटली होती. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली. रुद्रपूरमधील एका प्रतिष्ठीत शाळेच्या विद्यार्थ्याने शाळेची फी भरण्यासाठी ही लूट केल्याचे तपासात पोलिसांना आढळले. पोलिसांनी 23 डिसेंबरला दोन विद्यार्थ्यांसह चारजणांना पोलिसांनी अटक केल्यावर ही माहिती पोलिसांना मिळाली आहे.

कॅश मॅनेजमेंट कंपनीतील कर्मचाऱ्याच्या लूट प्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली असून एक संशियत फरार असल्याचे रुद्रपूरचे सर्कल ऑफीसर अमित कुमार यांनी सांगितले. शाळेची फी भरण्यासाठी ही लूट केल्याची अटक केलेल्या दोन विद्यार्थ्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. आपले वडील रुद्रपूरमधील एका कारखान्यात काम करतात. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे कंपनीचे नुकसान झाल्याने आपल्या वडिलांची वेतन कपात करण्यात आली. त्यामुळे शाळेची फी भरून शिक्षण घेण्याइतके पैसे आपल्याकडे नसल्याने आपण या लूटीत सहभागी झाल्याचे विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले.

आरोपींनी शर्मा यांच्यावर पाळत ठेवली होती. ते पैसे बँकेत भरण्यासाठी कधी जातात, ती वेळ त्यांनी हेरली होती. शर्मा कंपनीतील रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असताना बंदूकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून रक्कम लुटण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पाचव्या संशयिताचा शोध सुरू असून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here