तोडफोड करणाऱ्या 15 जणांवर दरोड्याचे चार गुन्हे दाखल

pimpri-todfod

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मोहननगर, चिंचवड येथे टोळक्‍याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी तोडफोड करणाऱ्या 15 जणांवर दरोड्याचे चार गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांकडून होत असलेल्या कडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

दीपक गिरी, युवराज काळे, आशिष गोरखा, हृषीकेश शिंदे, बाळासाहेब गवळी, प्रमोद बनगर, रोहित देशमुख, आकाश गायकवाड, अक्षय लोंढे, घनश्‍याम साळुंखे, आशिष कांबळे, करण ससाणे, अरविंद ऊर्फ सोन्या काळे, सुबोध ढवळे व त्यांचा एक साथीदार अशी एका गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इतर तीन गुन्ह्यांत आरोपी अटक दाखविण्यात आलेले नाहीत. बापू अण्णा अलंकार (वय 60), संतराम अर्जुन जगताप (वय 51), राहुल बबन अलंकार (वय 34) आणि पप्पुलाल सय्यद शेख (वय 45, सर्व रा. मोहननगर, चिंचवड स्टेशन) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी बापू अलंकार हे मोटारीतून लॅपटॉप काढून घेत असताना तिथे आलेल्या आरोपींशी शस्त्राचा धाक दाखवून 30 हजारांचा लॅपटॉप हिसकावून नेला. फिर्यादी बाबू यांच्या मोटारीच्या काचेवर कोयत्याने वार करून तोडफोड केली.

दरोड्याच्या दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी संतराम हे मोटार पार्क करीत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी दमदाटी करीत त्यांच्या मोटारीतील कारटेप चोरून नेला. तसेच मोटारीची तोडफोड केली. दरोड्याच्या तिसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी राहुल अलंकार हे मोटारीची पाहणी करण्यासाठी गेले असता आरोपींनी आम्ही इथले भाई आहोत, आम्हाला हप्ता का देत नाही, असे म्हणत त्यांच्या हातातील 12 हजारांचा मोबाइल फोन हिसकावून घेतला. तसेच पॅन्टच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच त्यांच्या मोटारीची तोडफोड केली. चौथ्या गुन्ह्यातील फिर्यादी पप्पुलाल शेख हे त्यांच्या रिक्षातून घरी येत होते. त्या वेळी आरोपींनी त्यांना अडवत इतर आरोपींनी त्यांच्या खिशातील रिक्षा व्यवसायाचे 740 रुपये शस्त्राचा धाक दाखवून काढून घेतले. इतर आरोपींनी रिक्षाची तोडफोड केली. या सर्व गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here