सावत्र पित्याचे अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य

sangamner

संगमनेर (प्रतिनिधी) – शहरात राहणार्‍या एका चौदा वर्षीय बालकाने सावत्र पित्याने अनैसर्गिक कृत्य केल्याच्या कथित आरोपावरून एका व्यक्तीवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित बालकाने दिलेल्या फिर्यादीवरून पोक्सोसह विविध कलमांखाली आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलाच्या आठ वर्षीय भावास पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून मुक्त करून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका गजबजलेल्या परिसरात एक गृहस्थ पत्नी व दोन मुलांसह राहात होता. 2014 साली त्याचा अपघाती मृत्यू झाला. अपघातानंतर मृताच्या पत्नीने कुटुंबाला आधार मिळावा म्हणून दुसर्‍या व्यक्तीशी विवाह केला. दरम्यानच्या काळात सदर महिला व्यवसायानिमित्त बाहेरगावी जात असे. ही महिला 29 डिसेंबर रोजी मुंबई येथे कामानिमित्त गेली असता तिचा पती व दोन मुले घरी होती.

यावेळी मध्यरात्री 14 वर्षांच्या बालकासोबत त्याच्या सावत्र पित्याने जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. तसेच याची वाच्यता न करण्याची धमकी दिली. पुन्हा 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी आरोपी तसेच कृत्य करू लागला. यावेळी आरोपीने दमदाटी करीत आठ वर्षीय बालकाला घराबाहेर हकलून दिले. यावेळी पीडित बालकाने आरोपीची नजर चुकवून तेथून पळ काढला.

तसेच शेजारी राहणार्‍या महिलेच्या घरात आश्रय घेतला. पीडित बालकाने घडला प्रकार शेजारील महिलेला सांगितला. शेजारच्या महिलेने या बालकाच्या आईस मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने मोबाईलवरून पोलिसांकडे मदतीची याचना केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून संगमनेर शहर पोलिसांनी तत्काळ पीडित बालकाचे घर गाठले. मात्र घराला कुलूप असल्याचे दिसून आले. आसपास चौकशी केली असता, मुलगा घाबरलेल्या अवस्थेत शेजारच्या महिलेच्या घरात आढळून आला.त्याला विश्‍वासात घेवून पोलिसांनी धीर दिला असता, त्याने आपल्या सावत्र पित्याने आपल्या भावास कुरण येथे सोबत नेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पीडित बालकाला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. तसेच कुरण गाव गाठत आरोपीस ताब्यात घेत आठ वर्षीय बालकाची सुटका केली. याप्रकरणी पीडित मुलाच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी संशयित सावत्र पित्याविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याचे (पोक्सो) कलम 6 नुसार इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here