नगर (प्रतिनिधी) – लग्नसमारंभात खाण्यात आलेल्या रबडीमुळे 80 जणांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी दुपारी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावात घडली आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये 25 लहान मुले व 55 महिला, वयोवृद्धांचा समावेश आहे.
टाकळीमिया येथे काळे-कडसकर यांचा शुभविवाह रविवारी दुपारी पार पडला. यावेळी पाहुणे मंडळी तसेच गावातील उपस्थित ग्रामस्थ जेवणाचा पाहुणचार घेऊन घरी परतले. दरम्यान, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बहुतांशी लोकांना मळमळ व उलटय़ांचा त्रास जाणवू लागला.
माहिती मिळताच गावकऱयांनी रुग्णवाहिकांना पाचारण करून बाधितांना दवाखान्यात हलविले. राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होममध्ये 40, राहुरीतील सहा खासगी रुग्णालयांत 28, तर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये 4 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. टाकळीमिया येथील चार दवाखान्यांत प्रत्येकी 2 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.







