राजस्थानात शेकडो कावळे मरून पडल्याने खळबळ

rajasthan-crow-dead

जयपूर – देशात कोरोनाला रोखण्याची लगबग सुरू असतानाच राजस्थानात बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाने हातपाय पसरायला सुरुवात केल्याने खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या काही भागात अचानक शेकडो कावळे मरून पडायला लागल्याने केंद्र सरकारने काही राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. चिंताजनक म्हणजे मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू या रोगांचे विषाणू आढळून आले.

शनिवारी राजस्थानातील झालावर येथे 25, बरा येथे 19 आणि कोटा येथे 22 तर जोधपूर येथे 152 कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. झालावर, कोटा, पाली आणि इतर ठिकाणांहून कावळ्यांचे आकस्मिक मृत्यू झाल्याच्या बातम्या नागरिकांची धडधड वाढवणाऱया आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्याने संपूर्ण राजस्थानमध्ये हायअॅलर्ट जाहीर केल्याची घोषणा राजस्थानचे मुख्य सचिव पुंजीलाल मीना यांनी केली आहे.

बर्ड फ्लूला रोखण्यासाठी केंद्राचा अलर्ट
राजस्थानसोबतच मध्य प्रदेशातील इंदूर येथेही 50 कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे या ठिकाणीही अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळून आले आहेत त्या ठिकाणचे नमुने गोळा करून त्याच्या तपासणीचे आदेश केंद्राने दिले आहेत. त्याचबरोबर संबंधित विभागाने बर्ड फ्लूची लक्षणे आढळून आल्याची ठिकाणे निश्चित करण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here