पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पिंपरी- चिंचवड शाखेत झालेल्या 22 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणातून तब्बल 50 टक्के रक्कम कर्जमंजुरीची लाच म्हणून स्वीकारण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे निवेदनाद्वरे केली आहे. दरम्यान, नगर अर्बन बँकेमध्ये अनेक घोटाळ्यांची प्रकरणे समोर येत आहेत. नुकताच 3 कोटी रुपयांचा घोटाळा नगर येथे उघडकीला आला आहे. यातच आता बँकेत लाच स्वीकारल्याचा आरोप गांधी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
नगर अर्बनच्या 3 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ज्या आरोपींविरुद्ध नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, तेच आरोपी या 22 कोटी रुपयांच्या अपहाराचे सूत्रधार आहेत. हा अपहार नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत घडला आहे. त्यामुळे चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सदर प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केली आहे.
या बोगस कर्जप्रकरणातील मूल्यांकन करणाऱया नगर अर्बनच्या पॅनेलवरील मूल्यांकनकाराने नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदविलेला आहे. त्यांच्या लेटरपॅडचा दुरुपयोग करून 1 कोटी किंमतीचे तारण मालमत्तेचे मूल्य 22 कोटी वाढवून दाखविण्यात आल्याचे या मूल्यांकनकाराचे म्हणणे आहे. या प्रकरणातील आरोपी राजकीय लागेबांधे असलेले आणि राजकीय वजनदार व्यक्ती आहेत. त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. नगर अर्बन बँकेचे वरिष्ठ अधिकारीदेखील या आरोपींना मदत करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आपण या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी गांधी यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.







