फेसबुक लाईव्ह करून धुळ्यातील युवकाचा भायंदर येथे आत्महत्येचा प्रयत्न

rashmi-karandikar

आयर्लंडचे फेसबुक अधिकारी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने वाचले प्राण

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – फेसबुक लाईव्ह करून धुळे जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मात्र, आयर्लंडचे फेसबुक अधिकारी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या प्रयत्नांमुळे या तरुणाचे प्राण वाचवण्यात आले आहेत. संबंधित तरुण फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करत असल्याचे आयर्लंड फेसबुक अधिकाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर या अधिकाऱ्याने महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधून या युवकाचा जीव वाचवला. या सर्व घटनाक्रमामध्ये मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी धुळे पोलिसांना सूचना देत मोठा अनर्थ टाळला.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास धुळ्यातील तरुण फेसबुकवर लाईव्ह आला. त्यानंतर या तरुणाने आपल्या मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार आयर्लंडमधील फेसबुक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी भारतीय पोलिसांशी संपर्क साधला.

दिल्ली पोलिसांकडून सदरची माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांना देण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरवात झाली. सुरूवातीला त्या व्यक्तीबद्दल कुठलीही माहिती नसताना पोलिसांनी सदर मोबाईल क्रमांकावर आत्महत्या करू पाहणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला त्याच्याशी बोलण्यास सांगितले. या दरम्यान मुंबई सायबर पोलीस खात्यातील एक अधिकारी या दोघांच्या फोन कॉलमधील संभाषण कॉन्फरन्सच्या माध्यमातून ऐकत होता. त्यानंतर त्या व्यक्तीचे मोबाईल लोकेशन हे भायंदर येथे असल्याचे कळाले. तेव्हा स्थानिक पोलिसांना त्या ठिकाणी पाठवून त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले.

दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक हा धुळे शहरातील एका होमगार्डचा मुलगा आहे. पोलिसांनी तरुणाच्या फेसबुक लॉकेशनच्या साहाय्याने तो राहात असलेल्या ठिकाणाचा शोध घेतला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सोमवारी या तरुणाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सर्व प्रकारात महाराष्ट्र पोलिसांच्या तत्परतेमुळे तरुणाचे प्राण वाचवण्यात यश आलं. यात रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here