पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – स्पिरीटची तस्करी करणाऱ्य़ाला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 36 लाख हून अधिक रुपयांचे 25 हजार लिटर स्पिरीटचा टँकर जप्त केला आहे. प्रमोदकुमार शामसुंदर कुशवाह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही माहिती उत्पादन शुल्क अधीक्षक प्रसाद सुर्वे आणि उपअधीक्षक संतोष झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्काचे पुण्यातील भरारी पथकाचे निरीक्षक अर्जुन पवार यांचे पथकास स्पिरीट तस्करीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बनावट गिर्हाईक पाठवून मुंबई – बँगलोर महामार्गावर कोळेवाडी गावाचे हद्दीत छापा टाकला. त्यावेळीचालक टँकरच्या कॅप्सुलवर चढुन पाईपच्या सहाय्याने मद्यार्क बॅरल मध्ये विनापरवाना भरत दिसून आला.
त्यानुसार पथकाने प्रमोदकुमार कुशवाह यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून 36 लाख 30 हजार रुपये किंमतीचे स्पिरटी, टाटा कंपनीचा टँकर, मद्यार्कसह बॅरल, वाहनाची कागदपत्रे, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







