उल्हासनगर शहरात १५ ते २० गावगुंडाच्या टोळीने तलवारी नाचवत केली लूट

ullhasnagar-crime

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – उल्हासनगर शहरात १५ ते २० गावगुंडाच्या टोळीने तलवारी हातात घेत दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकारामुळे उल्हासनगरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहे. रोहित झा, नंनु राय, सुधाकर यादव, लल्ली, संतोष, हरचंद आणि सूरज लोट यांच्या टोळीने ही दहशत माजवली आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर दोनच्या हनुमान नगर परिसरात रात्री एकच्या सुमारास १५ ते २० गुंड हातात तलवारी, लोखंडी रॉड घेऊन रहिवाशांच्या घरात घुसले. त्यांनी मिळेल त्या घरात घुसून तोडफोड करीत मोठ्या प्रमाणात लूटमार केली. या गुंडांनी दहापेक्षा अधिक घरे तर अनेक गाड्यांची तोडफोड केली. उल्हासनगरमधील एका सराईत गुंडाची ही टोळी असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन फक्त विचारपूस करून निघून गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याप्रकरणी उल्हासनगर एक नंबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या गुंडांना पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here