पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळ असलेल्या शारदा गणपती मंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारला आहे. तब्बल 22 ते 25 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
पुणेकरांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या गणेश मंदिरात चोरी झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुण्यातील मध्यवस्तीत शारदा गणेश मंदिर असून प्रसिद्ध गणेश मंडळापैकी एक मंदिर आहे. ऐन मध्यवस्तीत हे मंदिर आहे. सहसा मध्यरात्रीही मंदिरात गर्दी असते. पोलिसांची गस्त देखील असते.
पण या परिस्थितीत देखील चोरट्यांनी मध्यरात्री मंदिरात प्रवेश करून आतील दागिने आणि रोकड चोरून नेल्याचा प्रकार पहाटे समोर आला. यानंतर माहिती मिळताच घटनास्थळी विश्रामबाग पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे.







